मुंबई : गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला ५० लाख रुपये दंड करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी तसे निर्देश दिले आहेत.

गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग प्रकल्प हा मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम व पूर्व उपनगरांमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना जलद, सुलभ व सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या सर्व टप्प्यांची अंमलबजावणी ठरविलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावी यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने कालमर्यादा निश्चित केली आहे. दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले होते. उड्डाणपूल ३१ मे २०२६ पर्यंत वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र उड्डाणपुलाचे बांधकाम अपेक्षित गतीने सुरू न ठेवल्याप्रकरणी कंत्राटदारावर ५० लाख रूपये दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले.

गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग (GMLR) प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. टप्पा ३ (अ) मध्ये उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोटरी बांधकामाचा समावेश आहे. या प्रकल्पाअंतर्गत दिंडोशी – गोरेगाव – दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यान १.२६ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या उड्डाणपुलाच्या कामाची अभिजीत बांगर यांनी बुधवारी पाहणी केली. दिंडोशी न्यायालयापासून उड्डाणपुलाला सुरुवात होते. रत्नागिरी जंक्शन हॉटेल येथे ९० अंश कोनात उड्डाणपूल वळतो. या पूलाचे एकूण ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. खांबांवर तुळई स्थापित करणे, डेक स्लॅब ओतकाम, पोहोच मार्ग आदी कामांसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या उद्देशाने नियोजन करण्यात आले आहे. उड्डाणपूल ३१ मे २०२६ पर्यंत वाहतुकीस खुला करण्याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे. मात्र कंत्राटदाराने ठरविलेल्या वेळापत्रकाचे पालन न केल्याचे प्रत्यक्ष पाहणीदरम्यान स्पष्ट झाले.

या प्रकल्पासाठी गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरातील जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी दोन अत्याधुनिक बोगदा खनन संयंत्रे (टीबीएम) वापरण्यात येणार आहेत. बोगदा खनन संयंत्र जमिनीखाली उतरविण्यासाठी ८०० मेट्रिक टन आणि ३५० मेट्रिक टन वजनाची क्रेन आवश्यक आहे. पैकी ३५० मेट्रिक टन वजनाची क्रेन कार्यस्थळी दाखल झाली आहे. दुसरी क्रेन फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत कार्यस्थळी दाखल होणे अपेक्षित आहे. ही सर्व कामे पूर्ण करून १० मार्च २०२६ पर्यंत बोगदा खनन संयंत्र उतरविण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती बांगर यांनी दिली.