मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने घाटकोपरमध्ये इमारतीच्या छतावर ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव तयार केला जाणार आहे. पालिकेच्या क्रीडा संकुलाच्या सहा मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर हा ‘ओपन टू स्काय’ असा पालिकेचा पहिला वहिला जलतरण तलाव तयार करण्यात येणार आहे. पालिकेच्या ओडियन क्रीडा संकुलाच्या इमारतीच्यावर हा तलाव बांधण्यात येणार असून हा तलाव बांधण्यासाठी तळाच्या स्लॅबचे एकूण ८९० घनमीटर काँक्रिटीकरण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. हा तलाव म्हणजे अभियांत्रिकी कौशल्याचा नमुना असून पालिकेच्या अभियंत्यांनी महत्त्वपूर्ण टप्पा पार पाडला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्यावतीने घाटकोपर येथे उभारण्यात येत असलेल्या ओडियन क्रीडा संकुलाच्या प्रकल्पात एक भव्य आणि अत्याधुनिक ओपन-टू-काय जलतरण तलाव समाविष्ट करण्यात आला आहे. ज्याची अभियांत्रिकी रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही संपूर्ण इमारत सहा मजली असून, पाचव्या मजल्यावर २५ मीटर लांब आणि ५० मीटर रुंद आकाराचा मोठा असा छतावरील जलतरण तलाव तयार केला जाणार आहे. या तलावाचा एक महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे.
महानगर पालिकेचे क्रीडा संकुल या जागेवर आधीपासून होते. त्यात पूर्वी हा जलतरण तलाव जमिनीवर (ग्राउंड लेव्हलला) होता. परंतु, त्याच भूखंडावर क्रीडा संकुल आणि जलतरण तलाव अशा दोन्ही प्रकल्पांसाठी दोन आरक्षणे पडल्यामुळे, दोन्ही सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलतरण तलाव इमारतीच्या पाचव्या मजल्यावर हलवण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या संबंधित अभियंत्यांनी दिली. नियमानुसार जलतरण तलाव हा नेहमी ओपन-टू-स्काय अर्थात खुल्या स्वरुपाचा असावा लागतो, त्याच्यावर कोणतेही बाधकाम असू नये. त्यामुळे हा तलाव इमारतीच्या वर बांधण्यात येणार आहे.
खासगी स्वरुपाचे अनेक जलतरण तलाव इमारतीच्या छतावर असले तरी पालिकेचा असा हा पहिलाच तलाव असल्याची माहिती अभियंत्यांनी दिली. तसेच जर पूल जमिनीवरच ठेवला असता, तर चटई क्षेत्रफळ निर्देशांक कमी झाला असता आणि इतर क्रीडा प्रकार तिथे सामावून घेणे शक्य झाले नसते, त्यामुळे हा निर्णय घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. इमारतीच्या वर जलतरण तलाव नेल्यामुळे जागेचा जास्तीत जास्त वापर होऊन बॅडमिंटन, टेबल टेनिस, लॉन टेनिस, शूटिंग रेंज, बॉक्सिंग आणि जिम्नॅशियम यांसारखे इतर अनेक खेळ उत्तम प्रकारे सामावून घेणे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
अभियांत्रिकी कौशल्य कसे
जलतरण तलाव वरच्या मजल्यावर नेल्यामुळे इमारतीवर पाण्याचा प्रचंड भार येणार आहे. या जलतरण तलावामध्ये सुमारे २० लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता असणार आहे. हे प्रचंड वजन पेलण्यासाठी इमारतीचे बांधकाम अधिक मजबूत करण्यात आले असून, यात ‘विरेडियल गर्डर’ या विशेष अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामध्ये स्टीलच्या तुळई (गर्डर) प्रमाणे सिमेंटच्या तुळया तयार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अभियांत्रिकीच्या दृष्टीने आव्हानात्मक असलेले हे काम अत्यंत काटेकोर नियोजन, तांत्रिक कौशल्य, गुणवत्ता नियंत्रण आणि विविध यंत्रणांमधील प्रभावी समन्वय यांच्या जोरावर पूर्ण करण्यात आले असल्याचे अभियंत्यांनी सांगितले. ही उल्लेखनीय कामगिरी मुंबई महानगरपालिकेच्या बीसीईएस विभागातील अभियंत्यांनी केली आहे. मुंबई महानगरपालिकेचे इमारत बांधकाम विभागाचे उप प्रमुख अभियंता रमेश कुलकर्णी, कार्यकारी अभियंता भारत मोमले, सहाय्यक अभियंता अर्चना पाटील, दुय्यम अभियंता प्रज्ञा बांदल यांनी ही कामगिरी पार पाडली आहे.
