मुंबई: मुंबई महापालिकेच्या ठेवी रिकामी केल्याचा आरोप विरोधकांकडून होत असतानाच मागील चार वर्षांत मुंबई महापालिकेच्या ठेवींत १३ हजार कोटींची घट झाल्याची कबुली सरकारकडून विधान परिषदेत देण्यात आली. मुंबई महापालिकेच्या ९१ हजार कोटींच्य ठेवींत घट होऊन त्या ७९ हजार कोटींवर आल्या. पण या वर्षी ठेवीत दीड हजार कोटींची वाढ झाल्याने त्या ८१ हजार १३४ कोटींपर्यंत झाल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरील चर्चेवर बोलताना शिवसेना (ठाकरे) आमदारांनी पालिकेत गेल्या चार वर्षांत प्रशासकाच्या माध्यमातून कारभार सुरू असताना झालेल्या भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली होती. ६०० कोटी तुटीत असणारी पालिका शिवसेनेच्या २५ वर्षांच्या कार्यकाळात ठेवी ९२ हजार कोटींपर्यंत गेली होती. मात्र महापालिकेची निवडणूक न झालेल्या चार वर्षांत प्रशासकाच्या हाती कारभार आल्यानंतर या ठेवींत लक्षणीय घट झाल्याचा आरोप अनिल परब यांनी केला. या आरोपावर ठेवी कमी झाल्यामागे पायाभूत सुविधांची कामे असल्याचे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी केले.
मुंबईत आतापर्यंत १,४७८ रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून त्यांची एकूण लांबी २७८.८३ किलोमीटर आहे. उर्वरित रस्त्यांची कामे टप्प्याटप्प्याने सुरू आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच बेस्ट उपक्रमासाठी दरवर्षी एक हजार कोटी रुपयांची तरतूद महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात असून अतिरिक्त ४५० कोटी रुपये नवीन बेस्ट बस खरेदीसाठी देण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. प्रार्थनास्थळे, शाळा आणि रेल्वे स्थानकांपासून १०० मीटर अंतरावर फेरीवाले नसावेत यासाठी समित्या नेमण्यात आल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
वेतनासाठीच्या ठेवींना हात लावणार नाहीठेवी घटल्याने कर्मचाऱ्यांच्या पगार व निवृत्ती वेतनाबाबतही विरोधकांनी चिंता व्यक्त केली होती. यावर उत्तर देताना कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीसाठी ५,८५३ कोटी रुपये आणि निवृत्ती वेतन निधीसाठी ३,९४९ कोटी रुपये कायमस्वरूपी राखीव ठेवलेले आहेत. या निधीला हात लावला जाणार नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगार किंवा पेन्शनबाबत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. ही प्रथा गेली अनेक वर्षे सुरू असून भविष्यात या पैशांना महापालिका हात लावणार नाही, ते पैसे तसेच ठेवले जातील, असे आश्वासन सामंत यांनी दिले.
रस्ता सुशोभीकरणाची निविदा रद्द
रस्त्यांच्या सुशोभीकरणासाठी वापरण्यात आलेले फर्निचर घोटाळ्यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर रेलिंग व सुशोभीकरणाची कामे थांबवण्यात आली असून ३८० कोटी रुपयांची निविदा रद्द करण्यात आल्या आहेत, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले. तसेच अनियमितता टाळण्यासाठी पुढील निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिकेतील वर्षनिहाय ठेवी
२०१७ – ६२ हजार १९१ कोटी
२०१८ – ७२ हजार कोटी
२०१९ – ७६ हजार ५७९ कोटी
२०२० – ७९ हजार ११५ कोटी
२०२१ – ७८ हजार ७४५ कोटी
२०२२ – ९१ हजार ९९० कोटी
२०२३ – ८६ हजार ४०१ कोटी
२०२४ – ८२ हजार ७३७ कोटी
२०२५ – ७९ हजार ४९८ कोटी
