मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील घराघरांतून कचरा संकलन योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक घराला क्यूआर कोड देऊन कचरा संकलनाची पडताळणी करण्याची प्रणाली राबविण्याची सूचना स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनाला केली. याबाबत त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला पत्र दिले आहे.

मुंबईत घरोघरी कचरा संकलन प्रभावी होत नसल्यामुळे रहिवासी वाट्टेल तिथे कचरा टाकतात, कधी नाल्यातही कचरा टाकतात. त्यामुळे शहर विद्रुप होते. त्यामुळे सर्व घरांमधून दररोज कचरा गोळा केला जातो की नाही, याची तपासणी करण्यासाठी क्यूआर कोड आधारित प्रणाली विकसित करावी, अशी सूचना प्रभाकर शिंदे यांनी केली. प्रत्येक गल्लीतील पहिल्या, मधल्या आणि शेवटच्या घराला क्यूआर कोड देण्यात यावा.

कचरा संकलन प्रत्यक्षात घराघरांतून होत आहे की नाही, याची पडताळणी करण्यासाठी संबंधित घरातील रहिवाशांकडून महिन्यातून एकदा गुगल फोटो किंवा चित्रफितीच्या माध्यमातून अभियान राबवावे, असेही त्यांनी सुचविले आहे. या अभियानाच्या आधारे संबंधितांवर दंडात्मक कारवाई करता येईल आणि कचरा संकलनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असे शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.

अद्ययावत तंत्रज्ञानासाठी सूचना

– नागरिकांना त्यांच्या परिसरातील कचरा संकलन, उघड्यावर कचरा टाकणे तसेच रस्त्यावरील झाडांबाबतच्या तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र प्रणाली उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

या प्रणालीचा वापर नगरसेवकांपासून सामान्य नागरिकांपर्यंत कोणालाही करता यावा अशी त्याची रचना असावी.

– संस्था आणि स्वयंसेवक हे स्थानिक पातळीवर कार्यरत असल्याने तक्रारींचे एकाच दिवसात निराकरण झाले पाहिजे. त्यासाठी निश्चित वेळमर्यादा ठरवून देण्यात यावी. निर्धारित वेळेत तक्रारीचे निराकरण न झाल्यास प्रणालीद्वारे संबंधितांवर आपोआप दंड आकारण्यात यावा. – तसेच सर्व दंडाची रक्कम थेट प्रणालीद्वारे कापण्यात यावी आणि केवळ उर्वरित रक्कम संबंधित संस्थेला वितरित करण्यात यावी, असेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले.