मुंबई : पूर्व मूक्त मार्ग विस्तारीकरण (घाटकोपर – आनंद नगर उन्नत मार्ग) प्रकल्पातील ७०६ झाडांच्या कत्तलीसाठी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने घेतलेली जनसुनावणी आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वृक्षतोडीबाबतचा सविस्तर आराखडा आणि माहिती उद्यान विभागाला सादर केलेली नाही.
परिणामी, उद्यान विभागाच्या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे उद्यान विभागाने केव्हा, कोणाकडून सूचना – हरकती मागविल्या आणि १६ ऑक्टोबरो २०२५ मध्ये सुनावणी कशी घेतली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. परिणामी, उद्यान विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
घाटकोपर – ठाणे प्रवास अतिजलद करण्यासाठी एमएमआरडीएने पूर्व मूक्त मार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १६.८ किमी लांबीचा घाटकोपर – आनंद नगर, ठाणे असा उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. या उन्नत मार्गात पूर्व द्रुतगती मार्गावरील ७०६ झाडे बाधित होणार आहे. ३२० झाडे तोडली जाणार असून ३८६ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे.
मात्र या वृक्षतोडीला स्थानिकांनी, पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. या विरोधानंतरही एमएमआरडीएने ७०६ वृक्षतोडीबाबतचा प्रस्ताव उद्यान विभागाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. या प्रस्तावानुसार वृक्षतोडीबाबत ७ ऑक्टोबर २०२५ ला जाहिरात प्रसिद्ध करून त्यावर नागरिकांच्या सूचना-हरकती मागविण्यात आल्या. तर १६ ऑक्टोबर २०२५ ला यावर जनसुनावणी घेण्यात आली.
या जनसुनावणीत एकही सूचना-हरकत सादर झाली नव्हती. या जनसुनावणीनंतर एमएमआरडीएच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता असताना या जनसुनावणीवर, वृक्षतोडीबाबतच्या जाहिरातीवर ॲड. सागर देवरे यांनी आक्षेप घेत नोव्हेंबर २०२५ मध्ये थेट हरित लवादात धाव घेतली. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून यावर २७ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. हरित लवादातील सुनावणीपूर्वीच धक्कादायक बाब समोर आली आहे.
नियमानुसार वृक्षतोडीबाबतचा प्रस्ताव सादर करताना एमएमआरडीएने वृक्षतोडीबाबतचा सविस्तर आराखडा, हमीपत्र, झाडांची छायाचित्रांसह अन्य माहिती सादर करणे आवश्यक होते. ही माहिती सादर झाल्यानंतर ती उद्यान विभागाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करणे आवश्यक होते. या संकेतस्थळावरील माहितीच्याआधारे नागरिकांना सूचना-हकरती सादर करणे सोपे जाते. तर सूचना-हरकती सादर करण्याबाबत जनजागृतीही करणे, जाहिरात योग्य प्रकारे प्रसिद्ध करणेही गरजेचे असते.
असे असताना एमएमआरडीएच्या ७०६ वृक्षतोडप्रकरणी नियमांचे उल्लंघन झाल्याची बाब समोर आली आहे. पालिकेच्या उद्यान विभागाच्या २० फेब्रुवारीच्या एका पत्रानुसार एमएमआरडीएने वृक्षतोडीचा आराखडा, कागदपत्रे, छायाचित्रे सादरच केलेली नाहीत. उद्यान विभागाला हरित लवादाच्या याचिकेनंतर जाग आली असून आता एमएमआरडीएला आराखडा आणि सर्व कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. मात्र यावरून पालिकेच्या उद्यान विभागाचा अजब कारभार उघड झाला आहे.
हरित लवादासमोर बाब मांडणार
उद्यान विभागाकडून घेण्यात आलेली जनसुनावणी नियमबाह्य आहे. वृक्षतोडीचा आराखडा नसताना जाहिरात कशी प्रसिद्ध केली, त्यावर सूचना-हरकती कशी मागविल्या आणि जनसुनावणी कोणाची घेतली हा प्रश्न आहे. हरित लवादात याचिका दाखल झाली नसती तर उद्यान विभागाकडून नियमबाह्य सुनावणीच्या आधारे ७०६ वृक्षतोडीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असती. तेव्हा आता ही सगळी बाब हरित लवादासमोर मांडण्यात येईल. – ॲड. सागर देवरे, याचिकाकर्ते.
