मुंबई : गेल्या १४ वर्षांपासून रखडलेल्या गारगाई धरण प्रकल्पाला अखेर बुधवारी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली असून लवकरच प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची शक्यता आहे. तसेच, प्रस्तावात फेरबदल झाल्यानंतर प्रकल्पाची किंमत १.९६ टक्क्यांनी कमी झाल्याची बाब सत्ताधाऱ्यांनी उचलून ठरली. मात्र, तरीही प्रकल्प खर्चिक असून त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचा आरोप करून या प्रकल्पाला विरोधकांनी विरोध दर्शविला. संख्याबळाच्या जोरावर सत्ताधारी पक्ष अनेक प्रकल्प मंजूर करून घेत असल्याची टीका विरोधकांनी केली. मुंबईची सुमारे ४६६५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना सद्यस्थितीत सुमारे ४१०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. सन २०४१ पर्यंत मुंबईला प्रतिदिन ६४२४ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची आवश्यकता भासेल.

पाण्याची वाढती मागणी व पुरवठयामधील तफावत दूर करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गारगाई धरण प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याला शासनाची मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पांतर्गत, गारगाई नदीवर ६९ मीटर उंच व ९७९.४ मीटर लांबीचे धरण बांधणे, आदान मनो-याचे बांधकाम तसेच गारगाई ते मोडकसागर जलाशयादरम्यान अंदाजे १.६ किमी लांबीच्या जलवहन बोगद्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. हा प्रकल्प एप्रिल २०३० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा प्रस्ताव गेल्या दोन आठवड्यांपूर्वी मंजुरीसाठी स्थायी समितीकडे आला होता. मात्र, फेरविचारासाठी तो परत पाठविण्यात आला. त्यानंतर आवश्यक बाबी ध्यानात घेऊन प्रशासनाने त्यात फेरबदल केले आणि प्रस्ताव बुधवारी पुन्हा मंजुरीसाठी स्थायी समितीत सादर करण्यात आला. प्रकल्पातील विविध बाबींवर बोट ठेवून विरोधकांनी प्रकल्पावर आक्षेप घेतले. या प्रकल्पामुळे सुमारे ३ लाख १० हजार झाडे तोडावी लागणार असून त्यांचे पुनर्रोपण चंद्रपूरमध्ये करण्यात येणार आहे. त्यावर शिवसेनेचे (ठाकरे) यशोधर फणसे यांनी आक्षेप घेतला.

वाड्यातील हजारो झाडे चंद्रपूरमध्ये लावून पर्यावरणाचा समतोल कसा राखणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. फणसे यांच्या वक्तव्याला काँग्रेसचे अशरफ आझमी यांनी पाठिंबा देत प्रकल्पाला विरोध दर्शविला. तसेच, प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची मागणी फणसे यांनी केली. मात्र, समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी ती मागणी फेटाळून लावली. विरोधकांचा विरोध डावलून सत्ताधाऱ्यांनी बहुमताने प्रस्ताव मंजूर केला. दरम्यान, मुंबईकरांना पुरेसे पाणी पाणी मिळत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची तहान भागविण्यासाठी हा प्रकल्प सुरू होणे अत्यावश्यक आहे, असे सभागृह नेते गणेश खणकर म्हणाले.

वाड्यातील झाडांचे चंद्रपूरमध्ये पुनर्रोपण या प्रकल्पामुळे सहा गावे अंशत: बाधित होणार असून त्यांचे पुनर्वसन आजूबाजूच्या परिसरात करण्यात येणार आहे. तसेच, प्रकल्पासाठी सुमारे ३.१ लाख झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. या झाडांचे पुनर्वसन चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळील ६७० हेक्टर जमिनीवर करण्यात येणार आहे. पालिकेचे २६८ कोटी रुपये वाचणार मागील दोन आठवड्यांपूर्वी गारगाईचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी आला होता. मात्र, विविध शंका आणि प्रश्न उपस्थित झाल्याने हा प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठविण्यात आला होता. तसेच, या प्रकल्पाचे सादरीकरण करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार १६ मार्च रोजी प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. तसेच, प्रकल्पाच्या किंमतीबाबत कंत्राटदारांशी फेर वाटाघाटी झाल्यानंतर १.९६ टक्क्यांनी कमी झाली आहे. पूर्वी प्रकल्पाची एकूण किंमत ५३९६ कोटी रुपये इतकी होती. मात्र, फेर वाटाघाटीनंतर आता त्यात सुट मिळाली असून प्रकल्पाची किंमत ५०५१ कोटींवर आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीतील सुमारे २६८ कोटी रुपये वाचणार आहेत.