मुंबई : गेल्या तब्बल दोन दशकांपासून अधिक काळ ज्या धरणाची केवळ चर्चा सुरू होती त्या गारगाई धरणाच्या कामाला आता वेग येणार असून या धरणाच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार आहे. गारगाई धरणातील पाणी बोगद्याने मोडकसागर जलाशयात आणून पुढे अस्तित्वात असलेल्या जलवहन व्यवस्थेद्वारे मुंबई शहराला पुरवण्यात येणार आहे. धरण आणि जलबोगद्याचे काम व इतर कामांवर देखरेख करण्यासाठी सल्लागाराला २४ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूरीसाठी येणार आहे.
पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने गारगाई धरण प्रकल्पाला गती देण्याचे ठरवले आहे. राज्य सरकारने जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार मुंबई महापालिकेने मध्य वैतरणा धरण पूर्ण केल्यानंतर आता गारगाई धरण प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवले आहे. या प्रकल्पाची प्राथमिक अभियांत्रिकी कामे प्रगतिपथावर आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या पाणीपुरवठ्यात प्रतिदिनी ४४० दशलक्षलीटर इतकी वाढ होणार आहे.
गारगाई प्रकल्प पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावानजिक गारगाई नदीवर प्रस्तावित असून या प्रकल्पांतगर्त गारगाई नदीवर ६९ मीटर उंचीचे, ९७९ मीट लांबीचे धरण बांधणे, आदान मनोऱ्याचे बांधकाम तसेच गारगाई ते मोडकसागर जलाशयादरम्यान अंदाज १.६ किमी लांबीच्या जलवहन बोगद्याचे बाधकाम, मुख्यतः जलविद्युत जनित्र, बुडीत क्षेत्रातील सर्व वृक्षांचे प्रत्यारोपण, पुनर्वसनाकरिता पायाभूत सुविधांचा विकास या कामांचा मुख्यतः अंतर्भाव आहे. या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार आहे. धरणाचा बांधकाम खर्च २९० कोटी असून त्यावर सल्लागाराला २४ कोटी १४ लाख रुपये देण्यात येणार आहेत. वन विभागाला द्यावा लागणार मोबदला, बाधितांचे पुनर्वसन, बाधितांना नुकसान भरपाई, धरणाचे बांधकाम, जलबोगद्याचे जाळे हे धरून सर्व करांसह प्रकल्पाचा एकूण खर्च ५०५१ कोटी आहे.
गारगाई धरणातून किती पाणी पुरवठा?
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी सातही धरणातून दररोज ४००० दशलक्ष पाणी पुरवठा केला जातो. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत सध्या ४६०० दशलक्षलीटर पाणी पुरवठ्याची गरज आहे. त्यामुळे आजच्या घडीला मुंबईला सुमारे ६०० दशलक्ष लीटर पाण्याचा तुटवडा आहे. मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबईला २०४१ मध्ये ६ हजार ४०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. गारगाई धरण बांधून पूर्ण झाल्यास त्यातून रोज ४४० दशलक्ष लिटर पाणी मुंबईला मिळणार आहे.
उदंड झाले सल्लागार
पाणी पुरवठा प्रकल्पांमध्ये सल्लागार कंपन्यांवर वाढत्या अवलंबित्वाचा मुद्दा स्थायी समितीत वारंवार उपस्थित होतो. त्यावरून अनेकदा स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारले होते. यापूर्वी धरणे बांधली तेव्हा सल्लागार कंपन्यांचे इतके प्रस्थ नव्हते, नगरसेवकांनी महापालिकेच्या बाह्य सल्लागारांवरील वाढत्या निर्भरतेबाबत वारंवार चिंता व्यक्त केली. मात्र तरीही प्रशासनाने पुन्हा एकदा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याबाबत प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवला आहे.
