मुंबई : मुख्यमंत्री फेलोशिपच्या धर्तीवर मुंबई महापालिकेतर्फे जेन झी तरूणांसाठी फेलोशिप कार्यक्रम सुरू करण्यात आला असून या करीता पालिकेने पदवीधर तरुणांकडून अर्ज मागवले होते. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत तब्बल दहा हजाराहून अधिक तरुणांनी नोंदणी केली. तर ६८७९ तरुणांनी शुल्क भरले. त्यामुळे फेलोच्या एका जागेसाठी तब्बल २१६ तरुण इच्छुक आहेत. आलेल्या अर्जांची छाननी करून येत्या दोन महिन्यांच्या आतच फेलोची नियुक्ती करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न केला आहे.

मुंबई महापालिकेच्या कारभारात तरुणांचा सहभाग वाढण्याकरीता पालिकेने फेलो उमेदवारांची नेमणूक करण्याचे ठरवले आहे. याकरीता पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने १७ ऑगस्टला जाहिरात दिली होती. ३१ ऑगस्टपर्यंत या पदासाठी अर्ज करण्याची मुदत होती. गेल्या पंधरा दिवसातच या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पंधरा दिवसात तब्बल १०,८२० तरुणांनी या उपक्रमाकरीता नोंदणी केली. तर ६८७९ तरुणांनी शुल्क भरले. एवढ्या प्रचंड प्रतिसादातून पालिकेला ५० फेलो निवडावे लागणार आहेत.

स्थायी समिती अध्यक्ष, पालिका आयुक्त यांसह इतर खाते प्रमुखांच्या दिमतीला या ५० फेलोच्या नेमणुका केल्या जाणार आहेत. मुंबई महापालिकेत होणारी कामे, धोरण, प्रकल्पांचे नियोजन याचा अनुभव या फेलोंना मिळेल आणि मुंबई महापालिकेच्या कारभारालाही त्यांचा हातभार लागेल, या उद्देशाने फेलो उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे पालिकेतील सभागृह नेते गणेश खणकर यांनी सांगितले. आलेल्या अर्जांची छाननी करून पूर्ण पारदर्शक पद्धतीने एवढ्या अर्जांमधून ५० फेलोची निवड होईल, असेही त्यांनी सांगितले.

यामध्ये कोणालाही झुकते माप दिले जाणार नाही. लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करून साधारण दोन महिन्यांत फेलोची नियुक्ती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. या फेलोना मुंबई महापालिकेच्या विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. वर्षभरासाठी कंत्राटी पद्धतीने ही नियुक्ती होणार असून महिना सुमारे ६१,५०० रुपये विद्यावेतन आणि प्रवास भत्ता देण्यात येणार आहे.

असे असणार फेलोचे काम!

विशिष्ट कालावधीसाठी एखाद्या विभागाच्या कामकाजात सहभागी होऊन प्रशासन, धोरणांची अंमलबजावणी, प्रकल्पांचे नियोजन, माहितीचे विश्लेषण, अहवाल तयार करणे आणि संबंधित विभागाच्या कामात सहाय्य करणे, अशा स्वरूपाची जबाबदारी फेलोकडे असणार आहे. अर्ज शुल्क ५०० रुपये आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर, मराठी भाषेत लिहिता, वाचता, बोलता येणे अनिवार्य, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान, संगणक हाताळणी आणि इंटरनेट ज्ञान आवश्यक आहे. वय २८ वर्षांपेक्षा कमी असावे अशीही अट आहे.