मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहावर कारवाई केल्यामुळे गेल्या जवळपास महिनाभरापासून ते बंदच आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालयात येणारे कर्मचारी, सामान्य नागरिक यांना उपाशी राहावे लागत आहे. महिना होत आला तरी हे उपहारगृह बंद असल्यामुळे त्याचे पडसाद मंगळवारी पालिका सभागृहात उमटले. उपहारगृह सुरू करावे किंवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. तेव्हा महापौर रितू तावडे यांनीही पालिका प्रशासनाला उपहारगृह लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या काही दिवसांत मुंबईतील अत्यंत नामांकित हॉटेल आणि खाद्यपदार्थांच्या आस्थापनांवर धाडी टाकून तेथील अस्वच्छता उघड केली व धडक कारवाई केली. त्यामुळे विविध आस्थापनांमधील अस्वच्छतेच्या बातम्या बाहेर येऊ लागल्या होत्या. त्यातच महापालिकेच्या मुख्यालयातील उपहारगृहातील अस्वच्छतेच्या बातम्यादेखील उघड झाल्या होत्या. लस्सीत माशी आढळणे आणि भजीत प्लास्टिक आढळणे अशा तक्रारींमुळे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या महिन्यात २२ जुलै रोजी छापा टाकत संपूर्ण उपाहारगृहाची तपासणी केली. एफडीएच्या एका अधिकाऱ्याने सुमारे पाच तास उपहारगृहाची कॅन्टीनची पाहणी केली. नंतर रात्री उशिरा उपहारगृहाला टाळे ठोकण्याची कारवाई करण्यात आली. २२ जुलैपासून मुंबई महापालिकेचे उपहारगृह बंदच असून, महिना होत आला तरी हे उपहारगृह बंदच आहे.

महापालिकेचे उपहारगृह बंद असल्यामुळे पालिकेत येणारे कर्मचारी, अधिकारी, नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक यांना चहा मिळणेही मुश्कील झाले आहे. उपहारगृह बंद असल्याचे पडसाद मंगळवारी पालिका सभागृहात उमटले. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. उपहारगृह इतके दिवस बंद असल्यामुळे सगळ्यांचीच गैरसोय होते आहे. सहा-सात तास सभागृह चालते. त्यात मध्ये भूक लागली तरी नगरसेवकांना मुख्यालयाच्या बाहेर निघून जावे लागते. तेव्हा सभागृह नेते गणेश खणकर यांनीही प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली. तर कामगार अधिकाऱ्यांना दालनात बोलवून याबाबत अनेकदा विचारणा केली असता, याबाबतचा अहवाल येत नाही तोपर्यंत दुसरा कंत्राटदार ठेवू शकत नाही, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्याचे महापौर रितू तावडे यांनी सांगितले. कुठल्याही परिस्थितीत लवकर उपहारगृह सुरू करावे, असे निर्देश महापौरांनी दिले.

अहवाल आलाच नाही

दरम्यान, एफडीएने उपहारगृहावर का कारवाई केली, त्यात काय आढळले आणि उपहारगृह बंद असल्यामुळे पालिका प्रशासनाने काय पर्यायी व्यवस्था केली, याबाबतची माहिती सादर करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी महिनाभरापूर्वी दिले होते. मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याबद्दल प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनाला सभागृहात जाब विचारला.