मुंबई : खादी व ग्रामोद्योगांच्या माध्यमातून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देणे आणि स्थानिक उत्पादकांना ग्राहकांशी जोडण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने पुढाकार घेतला असून महापालिका मुख्यालयातील उपहारगृहात खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. महानगरपालिकेचे सभागृहनेते गणेश खणकर यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन गुरुवार, १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

या प्रदर्शनात खादीचे शर्ट, कुर्ते, जॅकेट, हातमागावर विणलेल्या साड्या, मध, साबण, तेल, कोल्हापुरी चप्पल, कारागिरांनी हाताने तयार केलेले दागिने, तसेच महिला बचत गटांनी बनविलेले विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.खादी व ग्रामोद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील कारागीर आणि उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना व खादी वस्त्रांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. स्थानिक कारागीर, लघुउद्योजक आणि पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खादी वस्त्रे तसेच ग्रामोद्योगांतर्गत तयार होणाऱ्या विविध उत्पादनांचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे. या उत्पादनांची खरेदी करून स्थानिक कारागीर व उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन खणकर यांनी केले. त्यावेळी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत, सहमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार डांगर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील उपस्थित होते.

ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीला चालना

खादी व ग्रामोद्योगांच्या उत्पादनांना अधिकाधिक ग्राहक उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, पारंपरिक कला व कौशल्यांचे जतन होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून खादी व ग्रामोद्योगांच्या उत्पादनांचा प्रसार करावा. महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील किमान एक दिवस खादीचे कपडे वापरावेत, असेही खणकर यांनी नमूद केले.