मुंबई : मुंबई महानगरपालिकेने बुधवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये सार्वजनिक आरोग्यासाठी ७ हजार ४५६ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत आगामी अर्थसंकल्पात तब्बल २२.१४ टक्के वाढ करण्यात आली आहे. गतवर्षी ६ हजार १०४ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्प करण्यात आली होती.
गतवर्षीच्या सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणांतर्गत रुग्णालयांचा विकास करण्यावर भर देण्याबरोबरच यंदा साथरोग नियंत्रणासाठी संशोधन, रुग्णांना गुणवत्तापूर्ण नॉन शेड्युल्ड औषधे उपलब्ध करण्यासाठी रुग्णालयांमध्ये जेनरिक औषध विक्री केंद्र सुरू करणे, रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेची माहिती मिळावी यासाठी डॅशबोर्ड तयार करणे, चार उपनगरीय रुग्णालयामध्ये डीएनबी अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेने २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य खात्याच्या महसुली खर्चाअंतर्गत ५ हजार २३७ कोटी ०९ लाख रुपयांची, तर भांडवली खर्चाअंतर्गत २ हजार २२१९ कोटी ७१ लाख रुपये इतकी तरतूद प्रस्तावित केली आहे. यामध्ये मुंबईच्या विविध भागामध्ये पुनर्विकासाचे काम सुरू असलेल्या सात रुग्णालयांचे काम वर्षाअखेरीस पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.
यामध्ये ॲक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालयातील इमारती, कस्तुरबा रुग्णालयातील भाजलेल्या रुग्णांच्या कक्षाचे अत्याधुनिकरण, वांद्रे भाभा रुग्णालय, कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी रुग्णालय, भांडुप मल्टिस्पेशालिट रुग्णालय आणि विक्रोळीतील क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे काम २०२६ मध्ये पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद व राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था यांच्या सहयोगाने हिवतापविराधी औषधांचे परिणामकारक संशोधन करण्यावर यंदा भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबच औषध प्रतिरोधक क्षयरोगामधील उत्परिवर्तन ओखळण्यासाठी करण्यात येत असलेल्या जीनोम सिक्वेन्सिंगबाबतचे संशोधन पूर्ण झाले असून, केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर चाचणी करण्यात येणार आहे.
१४ वर्ष वयोगटातील मुलींचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. तसेच यू- विन या संकेतस्थळावर बालकांची ऑनलाईन लसीकरण नोंदणी व भेटीची वेळ निश्चित करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
स्मार्ट नेत्र ज्योती उपक्रमांतर्गत मुंबई महानगरपालिकेचे दवाखाने आणि आपला दवाखाना येथे मधुमेही रुग्णांसाठी मधुमेहजन्य नेत्ररुग्णांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मोफत नेत्रतपासणी व उपचार सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या शाळांमधील किशोरवयीन मुला-मुलींमध्ये कौटुंबिक हिंसाचाराविरोधात जागरुकता करण्यात येणार आहे.
आरोग्य सुविधा पीपीपी तत्त्वावर उपलब्ध करणार
२०२६-२७ मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तीन रक्तशुद्धीकरण केंद्रे, तीन दवाखाने, तसेच विविध रुग्णालयांमध्ये सी. टी. स्कॅन, एमआरआय, रक्तशुद्धीकरण केंद्र, कॅथलॅब, रक्तपेढी सुविधा आणि अतिदक्षता विभाग सार्वजनिक खासगी तत्त्वावर (पीपीपी) उपलब्ध करण्यात येणार आहेत.
खाटांच्या उपलब्धतेसाठी डॅशबोर्ड
सर्व प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, विशेष रुग्णालये, प्रसूतिगृहांमध्ये उपलब्ध खाटांचा केंद्रीकृत डॅशबोर्ड तयार करण्यात येणार आहे. यावर खाटांची माहिती दररोज अद्ययावत होणार आहे. यामुळे नागरिकांना व प्रशासनाला खाटांच्या व्यवस्थापनासाठी मदत होणार आहे.
नागरी सुविधा केंद्रांची उभारणी
रुग्णालयाच्या आवारामध्ये रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी स्नानगृह, शौचालय, यांत्रिक धुलाई सेवा अशा विविध मुलभूत सुविधा सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत उपलब्ध करण्यासाठी नागरी सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे.
५० जेनेरिक औषधालये उभारणार
नागरिकांना परवडणारी व गुणवत्तापूर्ण नॉन-शेड्युल औषधे उपलब्ध करण्यासाठी शहरातील ५० निवडक ठिकाणी नॅकॉफच्या माध्यमातून जेनेरिक औषधालये सुरू करण्यात येणार आहे.
चार रुग्णालयांमध्ये डीएनबी सुरू करणार
उपनगरीय रुग्णालयांमध्ये डीएनबी अभ्यासक्रम सुरू केल्याने नागरिकांना घराजवळच उत्तम दर्जाचे उपचार मिळत असल्याने महानगरपालिकेकडून यंदा आणखी चार रुग्णालयांमध्ये डीएनबी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मालाडमधील म.वा. देसाई रुग्णालय, बोरिवलीतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, मुलुंडमधील सावरकर रुग्णालय, बर्वे नगरमधील संत मुक्ताबाई रुग्णालयामध्ये डीएनबी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

