मुंबई : मुंबईचा पुरातन वारसा म्हणून ओळख असलेल्या वास्तूंच्या देखभालीसाठी मुंबई महापालिका आता खास कंत्राट देऊन संस्था नेमणार आहे. मात्र या वास्तू आणि पुतळ्यांच्या यादीत रिगल सिनेमाच्या चौकातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचा समावशेच नसल्याचा मुद्दा शिवसेना (ठाकरे) पक्षाने उपस्थित केला. त्यामुळे भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या सदस्यांना या मुद्द्याला पाठिंबा द्यावाच लागला. शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याचा समावेश करून नव्याने प्रस्ताव आणण्याचे निर्देश अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले व प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे पालिकेत शिवसेनाप्रमुखांच्या नावाने राजकारण करणाऱ्या महायुतीला शिवसेनाप्रमुखांचाच विसर पडल्याची चर्चा सुरू होती.

दक्षिण मुंबईतील फ्लोरा फाउंटनसह फोर्ट परिसरातील कारंजी, प्याऊ आणि पुतळ्यांच्या संवर्धनासाठी ३ वर्षांचा करार करण्यात येणार आहे. वारसा वास्तूंची साफसफाई, स्टीम क्लिनिंग, दुरुस्ती आणि देखभालीची कामे या संस्थेकडून करवून घेतली जाणार असून त्याकरीता पालिका २ कोटी ३७ लाखांचा खर्च करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर बुधवारी चर्चेसाठी आला होता. त्यावेळी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक यशोधर फणसे यांनी आक्षेप घेतला. ज्या पुतळ्यांची व वास्तूंची देखभाल केली जाणार आहे त्या यादीत रिगल येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचा समावेश का नाही, असा मुद्दा फणसे यांनी उपस्थित केला.

शिवसेनाप्रमुखांच्या जयंती किंवा स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करण्याच्या आधी या पुतळ्याची स्वच्छता आम्ही करून घेतो, असेही त्यांनी सांगितले. तसेच या यादीत हुतात्मा स्मारकाचाही समावेश नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. पुरातन पुतळ्यांची व्याख्या काय, केवळ इंग्रजांच्या काळातील पुतळ्यांचीच देखभाल करणार का, अशी प्रश्नांची सरबत्ती फणसे यांनी केली.

दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये शिवसेनाप्रमुखांचा उभा पुतळा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईतील हा एकमेव पुतळा असून, २३ जानेवारी २०२१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र या पुतळ्याच्या देखभालीसाठी कंत्राट देण्याचा प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना विसर पडला. फणसे यांनी मुद्दा मांडल्यानंतर शिवसेना (शिंदे) पक्षाच्या यामिनी जाधव यांनी या मुद्द्याला पाठिंबा दिला. इंग्रजांच्या काळातील पुतळे आणि अलिकडच्या काळातील पुतळे यांच्या देखभालीबाबत स्पष्टता हवी, असा मुद्दा भाजपचे मकरंद नार्वेकर यांनी मांडला.

शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याची देखभाल विभागस्तरावर

शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याची देखभाल विभागस्तरावर केली जात असल्यामुळे त्याचा समावेश या यादीत केलेला नाही. तर हुतात्मा स्मारकाचा समावेश असल्याचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी यावेळी झालेल्या चर्चेनंतर सांगितले.

त्रयस्थ संस्था नेमावी

स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी या चर्चेची दखल घेत प्रस्तावात शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याचा समावेश करण्याचे आदेश दिले. तसे पुतळ्यांच्या देखभालीच्या कामांवर त्रयस्थ संस्थेची व एका तज्ज्ञ संस्थेची नेमणूक करावी, असेही आदेश दिले.