मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आपल्या प्रमुख आणि सलग्न अशा आठ रुग्णालयांची तीन वर्षे साफसफाई करण्यासाठी सर्व करांसह तब्बल १०१ कोटी ३ लाख ६३ हजार रुपयांचे कंत्राट ऑरा एफएमएस प्रा. लिमि. कंपनीला देण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या कंपनीला रुग्णालयांच्या साफसफाईसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि साफसफाईचे साहित्याचा पुरवठा करावा लागणार आहे.

तसेच अकुशल, अर्धकुशल कामगार आणि कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे बंधनकारक आहे. मात्र या कंपनीला हे कंत्राट देण्यासाठी स्थायी समितीची मंजुरी मिळालेली नाही. हा प्रस्ताव बैठकीत सादर झाल्यानंतर स्थायी समितीने ३० दिवसांमध्ये मंजुरी दिली नाही, तर समितीने पूर्वमान्यता दिल्याचे समजून हे कंत्राट सदर कंपनीला देण्यात येणार आहे.

या आठ रुग्णालयांसाठी नियुक्ती

मुंबईकरांना स्वस्तात उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने रुग्णालये, दवाखाने, प्रसूतिगृहे, आरोग्य केंद्रे, आपला दवाखाना आदी सुरू केले आहेत. यापैकी परळ येथील सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई सेंट्र येथील यमुनाबाई लक्ष्मण नायर धर्मार्थ रुग्णालय आणि टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय रुग्णालय, जुहू येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय दंत महाविद्यालय, जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालय, बोरिवलीमधील श्री हरिलाल भगवती मनपा सर्वसाधारण रुग्णालय आणि मुलुंड येथील मनसादेवी तुलसीदास अगरवाल मनपा सर्वसाधारण रुग्णालय या आठ रुग्णालयांमधील एकूण ४० लाख ९१ हजार २५६ चौरस फूट क्षेत्रफळाची दररोज नियमित साफसफाई करण्याच्या कामासाठी प्रशासनाने निविदा मागविली होती.

प्रशासनाने या कामासाठी १२० कोटी ६२ लाख ६६ हजार रुपयांची निविदा जारी केली होती. या कामासाठी १९ कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. यापूर्वी रुग्णालयातील साफसफाईचे काम दिलेल्या आठ कंपन्यांचा त्यात समावेश होता. या कंपन्यांचे पूर्वीचे काम असमाधानकारक असल्यामुळे त्यांच्या निविदा अप्रतिसादात्मक ठरविण्यात आल्या. त्यामुळे प्रतिसादात्मक ठरलेल्या ११ कंपन्यांच्या निविदांची छाननी करण्यात आली. छाननीअंती सर्वात लघुत्तम निविदा असलेल्या ऑरा एफएमएस प्रा. लिमि. कंपनीला हे काम देण्यावर शिक्कमोर्तब करण्यात आले. ऑरा एफएमएस प्रा. लिमि. कंपनीने हे काम १०१ कोटी ३ लाख ६३ हजार६५८ रुपयांमध्ये करण्याची तयारी दर्शविली आहे.

वीज-पाणी महापालिका पुरवणार

निविदेतील अटी व शर्तीनुसार यशस्वी निविदाराला किमान मनुष्यबळ, साफसफाईचे साहित्य आदींचा पुरवठा करणे आवश्यक आहेत, त्यासोबत अकुशल व अर्धकुशल कामगार, कर्मचाऱ्यांना किमान वेतन आणि काही भत्ते देणे बंधनकारक आहे. कंत्राटदाराला जागा, वीज आणि पाणीपुरवठा महापालिकेकडून करण्यात येणार आहे. मात्र साफसफाईसाठी आवश्यक जोडण्या, जलवाहिन्य, वीजेसाठी एक्स्टेन्शन आदींसाठी कंत्राटदाराला स्वखर्चाने व्यवस्था करावी लागणार आहे.

…तर कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई

प्रत्येक खातेप्रमुखांना रुग्णालयांतील स्वच्छतेच्या कामावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी खात्यातील सक्षम अधिकाऱ्यावर जबाबदारी सोपवावी लागणार आहे. निवड केलेल्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली व देखरेखीत या सेवा असतील. या अधिकाऱ्यांना कामकाजाचा दैनंदिन अहवाल दर १५ दिवसांनी खातेप्रमुखांना सादर करावा लागणार आहे.

रुग्णालयांतील स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा अथवा असमाधानकारक कामगिरी आढळल्यास कंत्राटदारावर दंडात्मक अथवा कार्यादेश रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित कंत्राटदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात येईल. कंत्राटदाराने कार्यादेश मिळाल्यानंतर ३० दिवसात सर्व सेवा पुरविल्या नाहीत, तर प्रतिदिन १० हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे.

कंत्राटदाराचा कर्मचारी अनुपस्थित असल्यास त्याच्या जागी तीन दिवसात दुसऱ्या कर्मचाऱ्याची नियुक्ती न केल्यास प्रति कर्मचारी प्रतिदिन १००० रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याने ओळखपत्र, गणवेश परिधान न केल्यास, पालिका अधिकारी – कर्मचाऱ्यांबरोबर गैरवर्तन केल्यास प्रतिदिन प्रतिघटना १००० रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे.

निविदा अटी-शर्तीनुसार नामांकीत कंपन्यांचे साहित्य न पुरवल्यास प्रतिदिन प्रतिघटना १००० रुपये दंड करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांनी वेतन वेळेवर मिळत नसल्याची तक्रार केल्यास कंत्राटदारावर कारवाई करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.