मुंबई : लोकसभा व विधानसभेच्या धर्तीवर मुंबई महापालिकेच्या सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण व ध्वनिमुद्रण करावे, अशी मागणी शिवसेना (ठाकरे) पक्षाने केली आहे. हजारो कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या कामकाजात पारदर्शकता यावी अशी मागणी गेली २५ वर्षे सत्तेत असलेल्या ठाकरे यांच्या शिवसेनेने केली आहे. ही मागणी सभागृहात मंजूर होते का, सत्ताधारी महायुती याबाबत काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे.

मुंबई महापालिकेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करावे, अशी मागणी शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या दोन नगरसेवकांनी केली आहे. माजी महापौर श्रद्धा जाधव आणि प्रथमच नगरसेवक बनलेले अंकित प्रभू या दोघांनी ही मागणी केली असून ती मार्च महिन्याच्या सभागृहाच्या कामकाजात समाविष्ट करण्यात आली आहे. अंकित प्रभू हे माजी महापौर आणि विद्यमान आमदार सुनील प्रभू यांचे पुत्र आहेत.

श्रद्धा जाधव यांनी आपल्या ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे की, मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका असून मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प लहान राज्यांच्या अर्थसकंल्पापेक्षा मोठा आहे. मात्र या महापालिकेच्या सभागृहात चालणारे कामकाज जनतेपर्यंत थेट पोहोचवण्याची कोणतीही व्यवस्था नाही. महापालिकेच्या सभागृहात येणारे विषय, त्यावरील चर्चा व ठराव हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असतात. त्यामुळे सभागृहात कोणत्या विषयावर चर्चा सुरू आहे, कोणते निर्णय घेतले जातात याची थेट माहिती जनतेला मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकसभा व विधानसभेच्या धर्तीवर महापालिका सभागृहाचे कामकाजही थेट प्रक्षेपित करावे, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.

अंकित प्रभू यांनी आपल्या ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिका ही जागतिक स्तरावरील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेवर संपूर्ण देशाचेच नव्हे, तर अख्ख्या जगाचे लक्ष असते. सभागृहात विविध प्रभागांशी संबंधित प्रस्ताव नगरसेवक साधकबाधक चर्चा करून मंजूर करीत असतात. सद्यस्थितीत मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या तरतुदीनुसार, महानगरपालिकेच्या सभांतील कामकाजाचे वृत्तांत कार्यवृत्त पुस्तिकेत केवळ नोंद करून ठेवण्याची तरतूद आहे.

लोकसभा, राज्यसभा, विधान सभा व विधान परिषद या सभागृहांतील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात येते. त्यामुळे, जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी किती प्रभावीपणे व परखडपणे त्यांच्या समस्या मांडतात हे लोकांपर्यंत थेट पोहोचते. मात्र, हजारो कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची आजही कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. पालिकेच्या सभागृहात होणारे कामकाज मुंबईकरांपर्यत पोहोचावे यासाठी थेट प्रक्षेपण युट्यूब व प्रसारमाध्यमांमार्फत करण्यात यावे, अशी मागणी प्रभू यांनी केली आहे.