मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या महायुतीमध्ये वेगळ्याच कारणावरून मिठाचा खडा पडला आहे. सुधार समितीमधील कामकाजाच्या पद्धती विरोधात भाजपच्या नगरसेवकांनी मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडे तक्रार केल्याचे समजते. सुधार समितीच्या कारभारात बाहेरील व्यक्तींचा हस्तक्षेप असल्याची तक्रार भाजपच्या नगरसेवकांनी केली आहे. बाहेरील व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून सुधार समितीच्या अध्यक्ष संध्या दोषी यांचे पती असून त्यांच्या वाढत्या हस्तक्षेपाविषयी ही तक्रार असल्याची चर्चा आहे.
मुंबई महापालिकेत स्थायी समिती खालोखाल अत्यंत महत्त्वाची असलेली वैधानिक समिती सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. आरक्षण बदलाचे प्रस्ताव, सार्वजनिक खासगी भागिदारीचे, भूखंडाबाबतचे, पुनर्विकासाचे प्रस्ताव या समितीपुढे येत असतात. भाजप- शिवसेना (शिंदे) महायुतीत या समितीचे अध्यक्षपद शिवसेना (शिंदे) पक्षाकडे आले आहे. या समितीच्या अध्यक्षपदी संध्या दोषी या आहेत. मात्र त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर समितीमधील भाजपच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. समितीमधील भाजपच्या सर्व सदस्यांनी नुकतीच मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांची भेट घेऊन अध्यक्षांबद्दल तक्रारी केल्याचे समजते.
सुधार समितीच्या अध्यक्षा संध्या दोषी यांचे पती विपुल दोषी यांचा हस्तक्षेप सुधार समितीच्या कामकाजात असतो हा या तक्रारीचा मुख्य सूर होता. विशेष म्हणजे सुधार समितीमधील विरोधकांमध्येही विपुल दोषी हेच समिती चालवत असल्याची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. सुधार समिती अध्यक्षांच्या दालनात विपुल दोषी हे नेहमीच उपस्थित असतात. सगळ्या बैठकांना ते उपस्थित असतात. सुधार समितीशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांशीही तेच संपर्कात असतात, तेच संवाद साधतात अशी विरोधकांमध्येही चर्चा आहे. याच तक्रारी भाजपच्या नगरसेवकांनीही पक्षश्रेष्ठींकडे केल्याचे समजते. समितीच्या बैठकीआधी भाजपच्या सदस्यांच्या बैठकीतही विपुल उपस्थित असतात. तेच भाजपच्या सदस्यांना काय करावे आणि काय नको ते सांगत असतात अशी नगरसेवकांची तक्रार आहे.
या प्रकरणी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्यांना सांगितले असून ही कार्यपद्धती योग्य नसल्याचा इशारा दिला आहे. तसेच सुधार समितीचे जे काही कामकाज असेल किंवा कोणाशीही संपर्क करायचा असेल तर तो अध्यक्षांनीच केला पाहिजे त्यांच्या पतीने करू नये अशीही समज देण्याचे आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
दरम्यान, संध्या दोषी यांना याबाबत विचारले असता, प्रत्येक स्त्रीच्या पाठिशी तिच्या नवरा उभा असतो तसाच माझा नवरा मला पाठिंबा देतो असे स्पष्टिकरण त्यांनी दिले आहे. नगरसेवकांच्या बैठकीत कधीही माझा नवरा नसतो. माझे पती किंवा माझे पती सुधार समितीच्या बैठकीत नसतात. उलट कोणाला काही समस्या असल्यास तेच नगरसेवक विपुल दोषी यांच्याशी चर्चा करतात किंवा त्यांच्याकडे मदत मागतात, अशी प्रतिक्रिया दोषी यांनी दिली आहे.
