scorecardresearch

विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित शाळा उपक्रमाची मुहूर्तमेढ ; एक लाख मुलांना लाभ होणार 

सुरक्षित शाळा’ या विषयाचे सूतोवाच पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात केले होते.

(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : शिक्षक, विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळावे, शाळा परिसरात कमीत कमी वाहनांची ये-जा व्हावी, पदपथ वर्दळमुक्त असावेत या उद्देशाने मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमाची मुहूर्तमेढ पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी रोवली. या उपक्रमासाठी २०० शाळांची निवड करण्यात आली असून या उपक्रमाद्वारे सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण देण्याचा प्रयत्न आहे.

मुंबई महापालिका शाळांच्या आवारात, तसेच सभोवतालच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विविध प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. ‘सुरक्षित शाळा’ या विषयाचे सूतोवाच पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात केले होते. त्याकरिता ५० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. या उपक्रमाचे उद्घाटन बुधवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. सह्याद्री राज्य अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमाला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड, वस्त्रोद्योगमंत्री, मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख, माजी महापौर किशोरी पेडणेकर, सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार, सहायक आयुक्त किरण दिघावकर शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आदी उपस्थित होते. हा उपक्रम शालेय शिक्षण विभाग आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून राज्यात सर्वदूर पोहोचला पाहिजे, अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. प्रत्येक शाळेच्या ५०० मीटर परिघामध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वावरता आले पाहिजे. त्यासाठी सुविधा आवश्यक असतात. प्रत्येक विद्यार्थ्यांची दंत, मानसिक आणि मधुमेह या तीन आरोग्यपैलूंच्या दृष्टिकोनातून काळजी घेणे अत्यावश्यक आहे, असेही ते म्हणाले.

सुरक्षित शाळा उपक्रम कशासाठी

मुंबईतील शाळांमध्ये जाणारे सुमारे ६० टक्के विद्यार्थी पायी शाळेत जातात. या मुलांना वाहतूक वर्दळीला सामोरे जावे लागते. शाळेत जाणाऱ्या मुलांचा अपघात होण्याचे प्रमाणही मोठे असून शाळेच्या ५०० मीटर परिसरात सुमारे ७४ टक्के विद्यार्थ्यांचे अपघात होतात. त्यामुळे पालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत शाळांच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर रंगीबेरंगी पट्टे मारणे, शाळेजवळच्या पदपथावर रेिलग बसवणे, शाळेच्या परिसरात वाहतूक वेगावर मर्यादा आणणे असे विविध उपाय केले जाणार आहेत. या उपक्रमासाठी २०० शाळांची निवड करण्यात आली असून त्यात शहर भागातील ८३, तर उपनगरातील ११७ शाळांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे एक लाख मुलांना लाभ होईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bmc launch safe and quality education campaign in presence of aditya thackeray zws

ताज्या बातम्या