मुंबईत दिवसेंदिवस वाढणाऱ्या करोनाग्रस्तांच्या संख्येला आळा घालण्यासाठी आता मुंबई महापालिकेने ‘मिशन झिरो’ ही संकल्पना हाती घेतली आहे. अंधेरीच्या शहाजीराजे भोसले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बीएमसीने करोनाविरोधातील लढ्यासाठी नवा अ‍ॅक्शन प्लान – “मिशन झिरो” लाँच केला आहे.

यानुसार, येत्या दोन-तीन आठवड्यात रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ५० फिरत्या दवाखान्यांची(मोबाइल व्हॅन) व्यवस्था करण्यात येणार आहे. मुंबईतील सहा विभागांमध्ये “मिशन झिरो” राबवण्यात येणार आहे. यात भांडुप , मुलुंड, बोरिवली, दहिसर, मालाड, कांदिवली परिसराचा समावेश आहे. परिसरातील रुग्णदुपटीचा कालावधी व करोनाची साखळी तोडण्यासाठी या परिसरात जाऊन रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. तसेच करोना संशयित रुग्णांना त्वरीत वेगळे करुन त्यांची कोविड टेस्ट केली जाणार. मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी ३६ दिवसांवरुन ५० दिवसांवर नेण्याचेही पालिकेचे लक्ष्य आहे.

आणखी वाचा- Coronavirus: ठाकरे सरकारच्या पाठीवर मोदी सरकारची कौतुकाची थाप

आणखी वाचा- सेंट जॉर्जमधील अंध करोना योद्धा राजू चव्हाणचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

दरम्यान, देशाच्या आर्थिक राजधानीतील करोनाचा कहर कायम असून रविवारी शहरात १२४२ नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या ४८ तासांमध्ये मुंबईत ४१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांतील ६९ मृत्यूंची नोंद करण्यात आल्यामुळे मृतांचा आकडा वाढून ३६६९ वर गेला आहे. त्यामुळे मुंबईतील मृत्यूदरही ५.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील करोनामुक्तीचा दर ५० टक्के झालेला असला तरी रोज नव्याने हजाराच्या पुढे रुग्ण आढळत आहेत. रविवारी १२४२ नवीन रुग्ण आढळून आल्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ६६,५०७ वर गेला आहे. तर आणखी ८६७ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. मृतांची संख्या ३६६९ वर गेली आहे. रविवारी ६२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ३३,४९१ रुग्ण करोनामुक्त झाले. तर २९,३४७ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांची आकडेवारी एखाद्या रुग्णालयाकडे प्रलंबित असल्यास त्याची माहिती ताबडतोब देण्याचा इशारा पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिल्यामुळे गेल्या काही दिवसांत मृत्यूंची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. गेल्या ४८ तासांत पालिकेकडे ११० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मात्र त्यातील ६९ मृत्यू हे १८ एप्रिल ते १८ जून या कालावधीतील आहेत. तर ४१ मृतांपैकी २८ जणांचे वय ६० वर्षांवरील आहे.