एकाच वेळी भरमसाठ कामांमुळे रस्ते विभागाची धांदल

महानगरपालिकेच्या रस्ते विभागाची कामाची क्षमता लक्षात न घेताच केवळ महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवत मुंबईतील भरमसाट रस्ते प्रकल्प मंजूर करण्याचा खटाटोप ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत अध्र्या रस्त्यांचीही कामे पूर्ण होणार नसल्याचे वास्तव समोर आले आहे. २०१६ मध्ये हाती घेण्यात आलेल्या १००४ रस्त्यांपैकी आजमितीला केवळ ५५८ रस्त्यांची कामे सुरू झाली असून पावसाळ्यापर्यंत यातील केवळ ४०७ रस्ते पूर्ण होतील, असा अंदाज आहे. म्हणूनच आता रस्त्यांचे पृष्ठभाग दुरुस्त करण्याची कामे पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

गेल्या दोन वर्षांत रस्त्यांसाठी अर्थसंकल्पातील तरतूद दामदुपटीने वाढवून तब्बल तीन हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्यात आली. २०१५ मध्ये ५१५ रस्त्यांच्या प्रकल्पांना मान्यता दिली गेली. त्यातील काही रस्त्यांचे काम सुरू असतानाच २०१६ मध्ये महानगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तब्बल १००४ रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यात ८८२ रस्ते व १२३ चौकांच्या दुरुस्तीची कामे होती. महानगरपालिकेच्या रस्ते विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात न घेता केवळ रस्ते प्रकल्पांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला गेला. या सर्व रस्त्यांच्या कामांना ऑक्टोबरमध्ये सुरुवात करण्यासाठी पालिकेने वाहतूक पोलिसांकडे मंजुरी मागितली होती. मात्र शहरातील १९०० किलोमीटरपैकी ३४० किलोमीटर रस्ते बंद करण्यात आल्यास वाहतुकीवर पडणारा ताण लक्षात घेता वाहतूक विभागाने तीन टप्प्यांत रस्तेकामाला मंजुरी दिली. प्रत्यक्षात पहिल्या टप्प्यातील रस्त्यांची कामेही अजून पूर्ण झालेली नाहीत. या वर्षी प्रकल्प रस्त्यांपैकी ५५८ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून त्यातील ४०७ रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील, अशी माहिती रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी मासिक आढावा बैठकीदरम्यान आयुक्तांना दिली.

रस्ते विभागातील मनुष्यबळ पाहता एवढय़ा रस्त्यांची कामे एका वर्षांत शक्य नसल्याचे माहिती असतानाही निवडणुका तोंडावर आल्याने भरमसाट रस्ते प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली, त्याचे परिणाम आता दिसत असल्याचे पालिकेतील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. पावसाळ्याआधी रस्त्यांची कामे पूर्ण करणे अशक्य असल्याने खड्डे पडून नयेत यासाठी एक हजाराहून अधिक रस्त्यांचे पृष्ठीकरण करण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त अजोय मेहता यांनी बैठकीत दिले. सध्या ११० रस्त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले असून त्यातील ८० टक्के रस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत, तर प्राधान्यक्रमात दुसऱ्या स्थानी असलेल्या ९३८ रस्त्यांपैकी ५० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला. खड्डे पडण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी केवळ खड्डे भरण्यापेक्षा संबंधित भाग नव्याने तयार करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले.