मुंबई : एका बाजूला धरणातील पाणीसाठा खालावलेला असता पाणीकपातीची टांगती तलवार मुंबईकरांवर आहे. त्यातच दरवर्षी केली जाणारी पाणीपट्टीवाढ यंदा लागू होणार का याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. पाणीपट्टीत दरवर्षी सहा ते सात टक्के वाढ केली जाते तशी वाढ यावर्षी जूनमध्ये होणार का याबाबत उत्सुकता आहे.
मुंबईकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पालिकेला पाण्याचे स्रोत विकसित करणे, जलशुद्धीकरण करणे, पाणीपुरवठा यंत्रणेत सुधारणा करणे, जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलणे, गळती दुरुस्त करणे, देखभाल व दुरुस्ती करणे अशी विविध कामे करावी लागतात. या सर्व कामांसाठी पालिकेला येत असलेल्या खर्चाच्या तुलनेत मुंबईकरांना पाणीपट्टी आकारली जाते. जल अभियंता खात्याचा आस्थापना खर्च, प्रशासकीय खर्च, जलवाहिन्यांच्या देखभालीचा खर्च, विजेचा खर्च, शासकीय धरणातून उपसा केलेल्या पाण्याची पाणीपट्टी यांच्या एकत्रित खर्चात दरवर्षी वाढ होत असते. त्यावाढीच्या तुलनेत पाणीपट्टीत दरवर्षी जास्तीत जास्त आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा ठराव २०१२ मध्ये स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार दरवर्षी जून महिन्यात काही टक्के वाढ केली जाते. १६ जूनपासून त्याची अंमलबजावणी केली जाते. करोना व टाळेबंदीमुळे गेल्या वर्षी ही वाढ करण्यात आली नव्हती. त्यानंतर २०२२ मध्ये ७.१२ टक्के वाढ करण्यात आली होती. यंदा निवडणुका तोंडावर असल्यामुळे पाणीपट्टीत वाढ होणार का याबाबत उत्सुकता आहे.




दरम्यान, नेहमीच्या पद्धतीनुसार लेखापाल विभागाने पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव जलअभियंता विभागाकडे पाठवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.