मुंबई : बकरी ईदनिमित्त धार्मिक पशुवधाच्या परवानगीचा अर्ज करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे यंदा पालिकेच्या अॅप्लिकेशनवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच, म्हैसवर्गीय प्राणी व बकरे यांचा आयात परवाना व ‘स्लॉट बुकिंग’साठीही ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. दरम्यान, देवनार पशुवधगृहात पशु बाजार तसेच धार्मिक पशुवधासाठी अन्य विविध प्रकारच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेच्या बाजार विभागामार्फत ७ ते ९ जूनदरम्यान महानगरपालिका क्षेत्रात एकूण १०९ ठिकाणी धार्मिक पशुवधासाठी परवानगी देण्यात आली आहे. संबंधित ठिकाणी किंवा इतर ठिकाणी धार्मिक पशुवध करायचा असल्यास त्याच्या परवानगीकरिता यंदा माय बीएमसी या मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासाठी नागरिकांना अॅपवर नोंदणी करावी लागेल.
संबंधित जागा सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा खासगी मालकीची असल्यास अर्ज करताना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ तसेच अर्जदाराचे ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वाहन परवाना) अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. किती पशु आणि कोणत्या दिवशी धार्मिक पशुवध करायाचे आहे, याचा उल्लेख नागरिकांना अर्ज करताना करावा लागणार आहे. धार्मिक पशुवध करताना पालिकेने दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक असून त्यासंबंधी अॅपवर माहिती देण्यात आली आहे.
धार्मिक पशुवधासाठी म्हैसवर्गीय प्राणी व बकरे आयात परवाना तसेच ‘स्लॉट बुकिंग’साठी https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नियंत्रण कक्ष आणि ९९३०५०१२९३ या क्रमांकावर मदतसेवा सुरू राहील. ४ ठिकाणी ध्वनिक्षेपक यंत्रणा तसेच नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी फलकांच्या माध्यमातून दिशादर्शन व सूचना प्रदर्शित करण्यात येतील.
देवनार पशुवधगृहात महानगरपालिका आणि अन्य यंत्रणांच्या माध्यमातून पशुंसाठी सुमारे ७७ हजार ८५० चौरस मीटर क्षेत्रावर निवारा उभारण्याचे काम सुरू असून २५० केव्हीए क्षमतेचे ८ आणि १२५ केव्हीए क्षमतेचे १९ विद्युत जनित्र तेथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बकरी ईदच्या १५ दिवसांच्या कालावधीत देवनार पशुवधगृह आणि आसपासच्या परिसरातील कचऱ्याचे निर्मूलन आणि विल्हेवाटीसाठी तीन पाळ्यांमध्ये ३०० स्वच्छता कर्मचारी, पिकअप व्हॅन, जेसीबी, डंपर यांच्यासह मृत जनावरे वाहून नेण्यासाठी ४ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
नागरिकांसाठी १०० फिरती शौचालये उभी करण्यात आली आहेत. तसेच, हँडमेटल डिटेक्टर, ५ डोअर मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरा आणि देखरेखीसाठी व्हिडिओ वॉल यंत्रणाही कार्यरत असेल. आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने निवासी वाड्यांमध्ये २ हजार ७५० अग्निशामक बाटल्या, रेतीच्या बादल्या व २०० लीटर क्षमतेच्या १०० पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
अनधिकृत पशुवधावर महापालिकेची करडी नजर
म्हैसवर्गीय पशूंच्या धार्मिक पशुवधाची व्यवस्था देवनार पशुवधगृहात करण्यात आल्यामुळे मुंबईत इतरत्र कोठेही धार्मिक पशूवध करता येणार नाही. परवानगी नसताना पशूवध केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी शहर विभागासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी एक भरारी पथक नेमण्यात येणार आहे.