वडाळ्यातील धोकादायक बनलेल्या ८८ टेनामेन्टमधील ‘सी’ विंग मंगळवारी पालिकेने रिकामी केली. या इमारतीमधील १४ कुटुंबांना पर्यायी निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
पावसाळ्यापूर्वी पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ८८ टेनामेन्टमधील ‘सी’ विंग धोकादायक असल्याचे निदर्शनास आले होते. त्या वेळी पालिकेने घरे रिकामी करण्यासाठी रहिवाशांवर नोटीसही बजावली होती. मात्र रहिवाशांनी घरे रिकामी करण्यास विरोध केला होता. या रहिवाशांमध्ये १२ पालिका कर्मचारी आणि दोन अन्य भाडेकरूंचा समावेश होता.
डॉकयार्ड येथील इमारत कोसळल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या पालिका अधिकाऱ्यांनी धावपळ करीत ८८ टेनामेन्टमधील ‘सी’ विंग रिकामी केली. या इमारतीमधील १४ पैकी १२ कुटुंबांना वडाळ्याच्या रावळी कॅम्पमध्ये, तर दोन कुटुंबांना माहुल येथे पर्यायी घरे देण्यात आली आहेत. पर्यायी घरे उपलब्ध झाल्यामुळे रहिवाशांनी कोणताही विरोध न करता तात्काळ घर रिकामे करून नव्या घरात स्थलांतर केले.