मुंबई : विकास निधीच्या वाटपात सत्ताधारी पक्षाला झुकते माप देण्याची प्रथा महापौर विकास निधीच्या वाटपाच्या वेळी महायुतीने कायम ठेवली. स्थायी समितीला मिळालेल्या विकास निधीचे वाटप करताना भाजपच्या नगरसेवकांना झुकते माप दिल्यावरून टीका झाली होती. मात्र महापौर विकास निधीच्या वाटपातही पुन्हा एकदा भाजपच्या नगरसेवकांना मोठा वाटा देण्यात आला आहे. तर शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेस पक्षाची बोळवण करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या तब्बल ८०,९५२ कोटींच्या अर्थसंकल्पातील खर्चाची बाजू शुक्रवारी पालिका सभागृहात मंजूर करण्यात आली. संपूर्ण अर्थसंकल्प मंजूर झाल्यामुळे या अर्थसंकल्पातील तरतुदी आता वापरता येणार आहेत. अर्थसंकल्पात फेरफार करून प्रथेनुसार महापौरांनाही विकास निधी म्हणून अडीचशे कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. महापौरांच्या शिफारशीनुसार तो नगरसेवकांना वितरित करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील हा सर्वाधिक महापौर विकास निधी आहे. दरम्यान, स्थायी समितीमधील विकास निधीच्या वाटपावरून वाद झाल्यानंतर महापौर विकास निधीचे वाटप कसे होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र महापौर रितू तावडे यांनीही भाजपच्या नगरसेवकांना भरभरून निधी दिला असून त्याखालोखाल शिवसेना (शिंदे) पक्षाला निधी दिला आहे. तर शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसची बोळवण केली आहे.
प्रत्येकी १ ते ३ कोटी
या निधीचे वाटप करताना सर्व नगरसेवकांना १ ते ३ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. त्यामध्येही काही नगरसेवकांना जादा निधी दिला आहे. घाटकोपरमधील भाजपच्या नगरसेविका अर्चना भालेराव यांना सर्वात जास्त निधी देण्यात आला आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर त्या भाजपमध्ये आल्या होत्या.
भाजपला सर्वाधिक निधी
महापौर विकास निधीतील तब्बल २०० कोटी रुपये निधी सत्ताधारी महायुतीला देण्यात आला. यामध्ये भाजपच्या नगरसेवकांना एकूण १४५.५ कोटी रुपये, तर शिवसेनेच्या नगरसेवकांना ५४.५ कोटी रुपये निधी देण्यात आला. दुसरीकडे विरोधी पक्षांना मिळून फक्त ६ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांना १ कोटी रुपये, तसेच शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या दीपमाला बढे आणि यशोधर फणसे यांनाही प्रत्येकी १ कोटी रुपये देण्यात आले. काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी, मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार आणि एआयएमआयएमचे गटनेते विजय उबाळे यांनाही प्रत्येकी १ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे.
सर्वाधिक निधी कोणाला
सर्वाधिक निधी मिळालेल्या नगरसेवकांमध्ये भाजपच्या अर्चना भालेराव यांना १० कोटी रुपये, शिवसेना (शिंदे) पक्षाचे किरण लांडगे यांना ५ कोटी रुपये, विजेंद्र शिंदे यांना ४.५ कोटी रुपये, तर भाजपचे तेजिंदर तिवाना यांना ५ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे.
या विभागांचा निधी कमी केला
महापौर विकास निधीसाठी अर्थसंकल्पात फेरफार करताना काही विभागांच्या तरतुदी कमी करण्यात आल्या आहेत. त्यात रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामासाठीच्या तरतुदीतून २५ कोटी वळवण्यात आले आहेत. तर पूल विभागाच्या तरतुदींमधून ५० कोटी वळवण्यात आले आहेत.
