मुंबई – मुंबई महापालिकेत शिवसेना (शिंदे) – भाजप यांच्या गट स्थापनेच्या घोषणेनंतर आता महापौर पदाच्या निवडीसाठी प्रक्रियेला वेग येणार आहे. महापौर पदासाठी भाजपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबई महापालिका निवडणूकीसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडले व १६ जानेवारीला मतमोजणीही झाली. या निवडणूकीत भाजपला सर्वाधिक ८९ जागा मिळाल्या. तर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाला २९ जागा मिळाल्या.
शिवसेना (ठाकरे)पक्षाला ६५ जागा तर मनसेला सहा जागा मिळाल्या. निवडणुकीचा निकाल लागून पंधरा दिवस उलटून गेले असून या काळात शिवसेना (ठाकरे), मनसे, कॉंग्रेस, एमआयएम या पक्षांनी कोकण भवन आयुक्तांकडे जाऊन आपली गटनोंदणीही केली. मात्र स्पष्ट बहुमत मिळालेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे) या पक्षांनी गटनोंदणी केली नव्हती. स्वतंत्र गटनोंदणी करायची की संयुक्त याबाबतचा निर्णय होत नसल्यामुळे ही गटनोंदणी रखडली होती. त्यातच गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे शासकीय दुखवटा जाहीर झाल्यामुळे ही गटनोंदणी होऊ शकली नाही.
सोमवारी मुंबई महापालिका मुख्यालयात भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक जमले होते व त्यांची बैठक पार पडली. त्यानंतर या दोन्ही पक्षांनी ठराव करून आपले गटनेते जाहीर केले व पक्षाचे नगरसेवक कोकणभवन येथे गटनोंदणीसाठी रवाना झाले आहेत. ही सगळी प्रक्रिया सुरू असतानाच महापौर पदाच्या उमेदवाराला मनसे पाठिंबा देणार असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र याबाबत मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
भाजप आणि शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत असले तरी विविध वैधानिक समित्यांमध्ये महायुतीचे आणि विरोधी बाकांवरील सदस्यांचे संख्याबळ समसमान होत आहे. त्यामुळे भाजपला समित्यांमधील बहुमतासाठी जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यातच मनसे भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. ठाकरे यांना डिवचण्यासाठी अशा अफवा पसवल्या जात असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, याबाबत मनसचे गटनेते यशवंत किल्लेदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, भाजपला पाठिंबा देण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत साधी चर्चाही झालेली नाही. भाजपला फेक नरेटिव्ह पसरवायचे असल्यामुळे या चर्चा घडवून आणल्या जात असल्याचा आरोपही किल्लेदार यांनी केला आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या गटनोंदणीनंतर आता महापौर निवडीची तारीख जाहीर होण्याची शक्यता असून लवकरच बहुप्रतिक्षित अशी मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी निवडणूक पार पडणार आहे.

