मुंबई : पुढील आठवड्यात मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. भाजप व शिवसेना (शिंदे) पक्षाला स्पष्ट बहुमत असून भाजपने महापौर निवडणूकीसाठी जोरदार तयारी केली आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार का याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. संख्याबळात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेना (ठाकरे) पक्षानेही महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याची तयारी सुरू केलेली असल्यामुळे महापौर पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक येत्या ११ फेब्रुवारीला होणार असून यावेळी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भाजपकडे बहुमत असून महापौर भाजपचाच होणार आहे हे निश्चित आहे. श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महापालिकेचे महापौर पद यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये महापौर निवडणूकीसाठी प्रचंड उत्साही वातावरण निर्माण झाले असून महापौर पदासाठी अर्ज भरण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. ११ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता निवडणूक होणार असून त्याकरीता शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी अर्ज भरता येणार आहे. भाजपने शनिवारी सकाळीच उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला ८९ , शिवसेना (शिंदे) पक्षाला २९ जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना (शिंदे) पक्षाकडे ६५ नगरसेवक, मनसेचे सहा नगरसेवक आहेत. कॉंग्रेसचे २४ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजप, शिवसेना(शिंदे) यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत असून भाजपचा महापौर निवडून येईल असे सध्याचे संख्याबळ आहे. मात्र मुंबई महापालिकेची निवडणूक बिनविरोध होते की विरोधी पक्ष उमेदवार देणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे आदेश

दरम्यान, शिवसेना (ठाकरे) पक्षाने आपल्या नगरसेवकांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुंबई न सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शनिवारी अर्ज भरण्याच्या दिवशीही मुंबई महापालिकेत जमण्यास सांगितले असल्याचे समजते. त्यामुळे शनिवारी अर्ज भरण्याच्या दिवशी याबाबत चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

गेल्यावेळी बिनविरोध …

गेल्यावेळी २०१७ च्या निवडणूकीत भाजपला ८२ तर शिवसेना (एकसंघ) पक्षाला ८४ जागा मिळाल्या होत्या. मात्र भाजपने सत्तेतही नाही आणि विरोधातही नाही अशी भूमिका घेत पहारेकरी म्हणून राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी कॉंग्रेसने उमेदवार दिल्यामुळे निवडणूक झाली होती. व एकसंघ शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर निवडून आले होते. तर दुसऱ्या अडीच वर्षांसाठी किशोरी पेडणेकर यांच्या समोर कोणीही उमेदवार न दिल्यामुळे तेव्हा त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या.