येत्या ४ ऑक्टोबरपासून राज्यभरातल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार ग्रामीण भागातील ५वी ते १२वी तर शहरी भागातील ८वी ते १२वीचे वर्ग सुरू होणार आहेत. त्यानुसार तयारी करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले असून नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये देखील शाळा सुरू करणयाची तयारी सुरू झाली असून त्यानुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर भर दिला जात असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

४ ऑक्टोबरपासून राज्यात शाळा सुरू, काय असतील नियम? शिक्षणमंत्र्यांनी दिली सविस्तर माहिती!

दोन दिवसांत दिशा निश्चित होणार!

दरम्यान, मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत बैठका सुरू असून त्यासंदर्भात निश्चित असा सविस्तर खुलासा सोमवार किंवा मंगळवारपर्यंत अंतिम होईल, असं देखील महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं. शनिवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

मुंबईत आत्तापर्यंत ७० टक्के शिक्षकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकाच वेळेला पहिला किंवा दुसरा डोस देणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी याआधीच स्पष्ट केलं आहे. त्यानुसार मंबई विभागवार या सगळ्यांचं लसीकरण केलं जाईल, अशी माहिती यावेळी महापौरांनी दिली. तसेच, सोमवारी पुन्हा एकदा फक्त महिला आणि युवतींचं लसीकरण केलं जाणार आहे, असं देखील त्यांनी सांगितलं.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी राज्यातल्या शाळा ४ ऑक्टोबर रोजी सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार, राज्यात ग्रामीण भागात ५वी ते १२वी चे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. त्यासोबतच, शहरी भागात ८वी ते १२वीचे वर्ग सुरू होतील. यासाठी टास्क फोर्स आणि राज्य सरकारने मिळून बनवलेली नियमावली सर्व शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांना लागू असणार आहे.