मुंबई : मुंबईमधील फेरीवाल्यांची नोंद, त्यांचे परवाने, ओळखपत्रे आणि वास्तव्यासंदर्भातील कागदपत्रांची तात्काळ तपासणी करावी, असे आदेश महापौर रितू तावडे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबईत अनधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या फेरीवाल्यांना २३७ बोगस जन्म प्रमाणपत्र दिले असून संबंधित फेरीवाल्यांच्या जन्मप्रमाणपत्राची छाननी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी नमूद केले. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील संबंधित २३७ जन्मप्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

रितू तावडे यांनी महापौर पदाची सूत्रे स्वीकारल्यानतर त्यांनी बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची घोषणा केली होती. त्यांनतर महानगरपालिकेतील महापौर दालनात शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत उपमहापौर संजय घाडी, भाजपचे गटनेते गणेश खणकर, माजी खासदार किरीट सोमय्या, नगरसेवक निल सोमय्या, प्रकाश गंगाधरे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, उपायुक्त शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी बांगलादेशी फेरीवाल्यांचा मुद्दा मांडला.

बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात अनेक पुरावे महानगरपालिका अधिकाऱ्यांना पूर्वीच देण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आलेली नाही, अशी खंत रितू तावडे यांनी व्यक्त केली. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची काम करण्याची इच्छाशक्ती दिसत नसल्याचा आरोप करत त्या म्हणाल्या की, यापुढे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी अपेक्षित कारवाई केली नाही, तर त्यांच्याविरोधात सभागृहात प्रस्ताव मांडण्यात येईल.

दरम्यान, मुंबईतील पदपथांवर बसणाऱ्या प्रत्येक फेरीवाल्याचे जन्म प्रमाणपत्र तपासण्यात येईल. त्याबाबतची मोहीम लवकरच युद्धपातळीवर सुरू केली जाईल, असे तावडे यांनी सांगितले. अवैधरित्या प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या डॉक्टर व संबंधित आरोग्य अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही हाती घेण्याचे आदेश महापौरांनी यंत्रणांना दिले. आतापर्यंत ८ जणांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित फेरीवाल्यांवर सोमवारपासून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, २ वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून अन्य अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शहरातील फेरीवाल्यांची नोंद, त्यांचे परवाने, ओळखपत्रे आणि वास्तव्यासंदर्भातील कागदपत्रांची तपासणी तात्काळ करण्याचे आदेश महापौरांनी यंत्रणांना दिले. मुंबईत फेरीवाला व्यवसाय करणाऱ्यांचे आधार कार्ड, इतर शासकीय ओळखपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करावी. अवैध कागदपत्रे असणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, याबाबत महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांच्यात समन्वय वाढविण्याचे आदेशही तावडे यांनी दिले.

गेल्या काही वर्षांत मुंबईतील फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच, परदेशी नागरिक अवैधरित्या व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. पदपथावरील फेरीवाल्यांची संख्या,अतिक्रमण आदींमुळे कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होत असल्याने ही मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.

बांगलादेशी फेरीवाल्यांना मदत करणाऱ्या १०० डॉक्टरांची यादी महानगरपालिकेला दिली आहे. त्यात मानखुर्द, गोवंडी, देवनार, नौपाडा, बेहरामपाडा, नागपाडा, कालिना, कुर्ला येथील अनेक डॉक्टर बोगस जन्म प्रमाणपत्र देतात, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला. या सर्वांवर महिनाभरात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी दिल्याचे त्यांनी नमूद केले.

महिनाभरात कुर्ला, माखुर्द पूर्व, मानखुर्द पश्चिम, मुलुंड आदी ठिकाणांची तपासणी केल्यानंतर अडीच हजार संशयित फेरीवाले आढळून आले. त्यांचा जन्म भारतात झाला असल्याचा एकही पुरावा त्यांच्याकडे नाही. बांगलादेशी अपात्र नागरिकांना महाराष्ट्रात राहता येणार नाही, असे ते म्हणाले.