मुंबई : शिवजयंतीनिमित्त भायखळा येथील जिजामाता उद्यानातील बालशिवाजीच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेल्या विविध संघटनांना आज ताटकळत राहावे लागले. महापौरांच्या हस्ते अभिवादन होत नाही तोपर्यंत या संघटनांना थांबवण्यात आले होते. महापौरांना यायला खूपच विलंब झाल्यामुळे अभिवादन करण्यासाठी आलेले शिवप्रेमी नागरिक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाला.

शिवजयंतीनिमित्त मुंबईत विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमी नागरिकांनी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मुंबई डबेवाला असोसिएशनच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही जिजामाता उद्यानातील बालशिवाजीच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याकरीता रितसर ११ वाजताची वेळही घेण्यात आली होती. जिजामाता उद्यानातील बालशिवाजीच्या पुतळ्याला महापौरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे.

मात्र गुरुवारी महापौर रितू तावडे यांना या ठिकाणी पोहोचण्यास विलंब झाला. महापौर १० वाजता अभिवादन करण्यासाठी येणार होत्या. मात्र त्यांना विलंब झाला. त्यामुळे बराचवेळ वाट पाहून अखेर उपस्थितांनी आम्हाला अभिवादन करण्याची परवानगी द्या असा आग्रह धरला. मात्र सुरक्षा रक्षकांनी या सर्वांना महापौर येईपर्यंत थांबण्याचे आवाहन केले. त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि शिवप्रेमी यांच्यात वाद झाला. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रतिनिधीही उपस्थित होते. अखेर जिजामाता उद्यानाच्या प्रशासनाने हस्तक्षेप करून या शिवप्रेमींना आधी अभिवादन करण्याची परवानगी दिली व हा वाद मिटला.

दरम्यान, दरवर्षी महापौर १० वाजताच जिजामाता उद्यानातील पुतळ्याला अभिवादन करतात. मात्र यंदा महापौरांना यायला उशीर झाला. त्या किती वाजता येणार हे देखील माहीत नव्हते. तसेच आमच्यासोबत लहान मुले देखील होती. त्यामुळे आम्ही आधी अभिवादन करण्याची परवानगी मागितली, असे डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले. महापौरांच्या आधी अभिवादन करणे हा गुन्हा असेल तर आमच्यावर कारवाई करावी, असे आम्ही सांगितले. त्यानंतर आम्हाला अभिवादन करण्याची परवानगी दिली, असेही तळेकर यांनी सांगितले.

महापौर रितू तावडे गुरुवारी सकाळी गेट वे ऑफ इंडिया येथे शिवजयंतीच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. त्यानंतर त्या बीकेसी येथील ‘मुंबई क्लायमॅट वीक’ परिषदेला गेल्या. त्यामुळे त्यांना जिजामाता उद्यानात पोहोचण्यास उशीर झाल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, सामान्य नागरिकांना अभिवादन करण्यापासून रोखले नसून त्यांना महापौरांच्या आधी अभिवादन करण्याची परवानगी दिल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.