मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांच्या हातातील घड्याळाची सध्या समाजमाध्यमांवर चर्चा आहे. रितू तावडे यांच्या हातात रोलेक्स कंपनीचे घड्याळ असल्याची चर्चा आहे. या घड्याळाची किरकोळ बाजारातील किंमत ६० ते ७० लाख असून भारतातील मार्केट किंमत १ कोटीपेक्षा अधिक असल्याचे समजते आहे.

महापौरांच्या हातात १ कोटींचे घड्याळ

मुंबईच्या महापौर पदी निवडून आलेल्या घाटकोपरच्या नगरसेविका रितू तावडे या सध्या वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या मनगटावर तब्बल एक कोटी किंमतीचे घड्याळ असल्याची समाजमाध्यमांवर चर्चा सुरु आहे. समाजमाध्यमांवर महापौर आणि त्यांच्या या घड्याळाची छायाचित्रे प्रसारित झाल्यानंतर या महागड्या घड्याळ्याबाबत मुंबईकरांचे कुतूहल वाढले आहे.

हे घड्याळ नेमके कोणते आहे आणि त्याची किंमत किती याची चर्चा सुरू आहे. समाजमाध्यमांवर याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. हे घड्याळ जगभरात प्रसिद्ध असलेल्या रोलेक्स या कंपनीचे असल्याचे समजते आहे. अठरा कॅरेट सोन्याचे हे घड्याळ असून त्याला आकर्षक पांढरी डाएल असल्याचे दिसते आहे.

दरम्यान, महापौर रितू तावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. समाजमाध्यमांवरील घड्याळाबाबतची माहिती पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे. माझ्या हातातील घड्याळ मायकल कोर्स कंपनीचे आहे. ते रोलेक्स डेटोनाचे नाही. त्यामुळे लाखो कोट्यवधीचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे. अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही, असेही त्यांनी समाजमाध्यमांवर प्रत्युत्तर दिले आहे.

रितू तावडे यांची संपत्ती ….

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात महापौर रितू तावडे यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे पाच कोटी २६ लाख ७६ हजार ४१७ रुपये नमुद करण्यात आली आहे. रितू तावडे यांच्या नावावर तीन वाहने असून त्यात टोयोटा फॉर्च्युनर (४६ लाख ५० हजार रुपये), ह्युंदायी आय २० स्पोर्टस् (सहा लाख ४३ हजार १३६), आणि होंडा ॲक्टीवा (९० हजार १५० रुपये) या वाहनांचा समावेश आहे.