मुंबई : मुंबईमध्ये २६ जुलै २००५ रोजी कोसळलेल्या प्रलयंकारी पावसानंतर अकारळविक्राळ रुप धारण करून हाहाकार उडविणाऱ्या मिठी नदीतून यंदा गाळ उपसण्याचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट रस्त्याचे डांबरीकरण, संरक्षक भिंत बांधण्याचा आणि सुशोभिकरणाचे काम करण्याचा अनुभव असलेल्या कंत्राटदारांच्या झोळीत टाकण्याची तयारी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सुरू केली आहे.
मिठी नदीतील तीन निरनिराळ्या ठिकाणच्या गाळ उपसण्याच्या कामाचे एकूण ३० कोटी १० लाख रुपयांचे कंत्राट निविदेला प्रतिसाद देणाऱ्या केवळ दोन कंत्राटदारांना देण्याचे घाट आहे. यापैकी एका कंपनीला दोन, तर एका कंपनीला एक काम देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यावर स्थायी समितीने अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही.
राज्य सरकारच्या आदेशानुसार मिठी नदीमधील २००५ ते २०२३ या कालावधीत गाळ उपसण्याच्या कामांची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे विभागाच्या पोलिस सह आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात आले असून गाळ उपसण्याच्या कामाबाबत ६ मे २०२५ रोजी प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे चौकशी सुरू असलेल्या कंत्राटदारांमार्फत मिठी नदीमधील गाळ उपसण्याचे काम करून घेणे अशक्य बनले आहे. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेने मिठी नदीच्या पावसाळापूर्व साफसफाईसाठी निविदा मागविल्या होत्या. तसेच चौकशीचा ससेमिरा पाठी लागल्यामुळे अनेक कंत्राटदारांनी या कामाकडे पाठ फिरवली आहे.
९.४७ कोटीचे काम एका कंपनीला
महापालिकेने काही अटी शिथिल करून २०२६ या वर्षासाठी मिठी नदीतील गाळ उपसण्याच्या कामासाठी निविदा मागविल्या होत्या. निविदेतील अटी-शर्तीनुसार पावसाळ्यापूर्वी ८० टक्के आणि उर्वरित कालावधीत २० टक्के गाळ मिठी नदीतून काढावा लागणार आहे. प्रशासनाने फिल्टरपाडा, पवई ते शिक्षक कॉलनी, कुर्ल्यापर्यंत मिठी नदीतील गाळ काढणे आणि साफसफाई करण्याच्या कामासाठी मागविलेल्या निविदेस मे. प्रशांत प्रकाश लाड आणि श्री. तुळजा भवानी कन्स्ट्रक्शन या दोन कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. त्यापैकी उणे १ टक्का दराने काम करण्यास तयार असलेल्या मे. प्रशांत प्रकाश लाड कंपनीला ९ कोटी ४७ लाख ३९ हजार ३४६ रुपयांचे कंत्राट देण्यावर प्रशासनाने शिक्कामोर्तब केले आहे. मात्र लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रांतर्गत रस्त्याचे डांबरीकरण आणि कोतवाल व अंजनी गाव येथे संरक्षक भिंत बांधण्याचा अनुभव असलेल्या या कंपनीला मिठी नदीच्या सफाईची जबाबदारी सोपविण्याचे घाटत आहे.
२०.३५ कोटीची दोन कामे अन्य कंपनीला
मिठी नदीच्या कुर्ला येथील शिक्षक कॉलनी ते बीकेसी कनेक्टर पुलापर्यंतच्या भागातील, तसेच बीकेसी कनेक्टर पूल ते माहीम आउडफॉल आणि त्याच्या टेल टॅनेलपर्यंतच्या भागातील गाळ उपसण्यासाठी मागवलेल्या दोन निविदांना श्री. तुळजा भवानी कन्स्ट्रक्शन आणि मे. प्रशांत प्रकाश लाड याच दोन कंपन्यांनी प्रतिसाद दिला.
प्रशासनाने केलेल्या वाटाघाटी अंती मिठी नदीच्या कुर्ला येथील शिक्षक कॉलनी ते बीकेसी कनेक्टर पुलापर्यंतच्या भागातील काम उणे ०.१ टक्के दराने काम करण्याची तयारी दर्शविणाऱ्या श्री. तुळजा भवानी कन्स्ट्रक्शन कंपनीला १० कोटी ०६ लाख ८६ हजार ४५६ कोटी रुपयांचे कंत्राट देण्याची तयारी सुरू आहे. तर मिठी नदीच्या बीकेसी कनेक्टर पूल ते माहीम आउडफॉल आणि त्याच्या टेल टॅनेलपर्यंतचा गाळ उपसण्याचे काम उणे ६ टक्के दराने करण्याची तयारी श्री. तुळजा भवानी कन्स्ट्रक्शन कंपनीने दर्शविली असून या कंपनीला हे नऊ कोटी ५१ लाख १० हजार ७०४ कोटी रुपयांचे काम देण्यावर प्रशासनाने शिक्कामोर्तब केले आहे. श्री. तुळजा भवानी कन्स्ट्रक्शन कंपनीला अफगाण चर्च, डक्सबरी लेन, कुलाबा कॉजवे, नेव्हीनगर, कुलाबा येथील संरक्षिक भिंतीचे बांधकाम आणि सुशोभिकरणाच्या कामाचा अनुभव आहे. मात्र स्थायी समितीने अद्याप या कामांना मंजुरी दिलेली नाही.
मंजुरीअभावी कंत्राट झोळीत पडणार
दरम्यान, स्थायी समितीने बैठकीत मांडलेले हे प्रस्ताव ३० दिवसांच्या आत निकाली काढले नाहीत, तर त्यास स्थायी समितीने पूर्व मंजुरी दिली आहे असे समजण्यात येणार आहे. त्यामुळे ही कामे या दोन कंपन्यांच्या झोळीत पडणार आहेत.
