मंबई : वांद्रे – कुर्ला संकुलातील (बीकेसी) वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, कुर्ला रेल्वे स्थानक आणि वांद्रे रेल्वे स्थानकावरून बीकेसीत पोहोचणे सोपे व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पॉड टॅक्सी प्रकल्प हाती घेतला आहे. वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानक व्हाया बीकेसी अशा ८.८ किमीच्या पॉड टॅक्सी मार्गिकेच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी (३ एप्रिल) करण्यात येणार आहे.काम सुरू झाल्यापासून तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करून पॉड टॅक्सी सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बीकेसीमध्ये २०२९ मध्ये पॉड टॅक्सी धावताना दिसणार आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून बीकेसीचा विकास एमएमआरडीएकडून केला जात आहे. मात्र या आर्थिक केंद्रात आजघडीला वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. गर्दीच्या वेळी बीकेसीत प्रवेश करणे वा तेथून बाहेर पडण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. बीकेसीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने पॉड टॅक्सीचा पर्याय आणला आहे. कुर्ला रेल्वे स्थानक ते वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक व्हाया बीकेसी अशी पॉड टॅक्सी सेवा सार्वजनिक – खासगी सहभागातून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाप्रमाणे ८.८ किमीच्या पॉड टॅक्सी मार्गाची उभारणी, देखभाल आणि संचालनाचे कंत्राट हैदराबादमधील साई ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले आहे. या कंपनीने या प्रकल्पासाठी लंडनमधील हिथ्रो विमानतळावर पॉड टॅक्सीची सेवा देणाऱ्या मे. अल्ट्रा पीआरटी कंपनीची मदत घेतली आहे. दरम्यान, हे कंत्राट देऊन बरेच महिने उलटले असून आतापर्यंत पॉड टॅक्सीचे काम सुरू होणे अपेक्षित होते. तसेच पॉड टॅक्सी २०२७ पर्यंत सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र भूसंपादनासह अन्य कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब झाला. पण आता मात्र या प्रकल्पाच्या कामाला शुक्रवारी सुरुवात होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी बीकेसीत पॉड टॅक्सीच्या मार्गिकेच्या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे. भूमिपूजनानंतर तात्काळ कामाला सुरुवात करण्यात येणार असून तीन वर्षांत प्रकल्पाचे काम पूर्ण करून पॉड टॅक्सी सेवेत दाखल करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मार्गिकेच्या भूसंपादनातील अडचणीही दूर झाल्याने काम वेगात सुरू करण्यात येणार असून निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करून पॉड टॅक्सीची सेवा उपलब्ध करून देऊ, असा दावाही अधिकाऱ्यांनी केला आहे.
बीकेसीत येण्या-जाणाऱ्या नागरिकांना २०२९ मध्ये पॉड टॅक्सीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मात्र पॉड टॅक्सीचा पर्याय प्रवाशांना परवडणारा असेल का, हा मोठा प्रश्न आहे. पॉड टॅक्सीसाठी प्रवाशांना प्रति किमी २१ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानुसार वांद्रे रेल्वे स्थानक ते बीकेसीसाठी अंदाजे ५० ते ७५ रुपये मोजावे लागतील. महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रवास महागडा ठरणार असल्याची चर्चा आहे.
