मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमधील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) पूर्व प्राथमिक शाळांमध्ये सोमवारी प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. शाळेत पहिल्यांदा पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्यांच्या मनात शिक्षण व शाळेविषयी आपुलकी निर्माण व्हावी, यासाठी त्यांचे चॉकलेट, भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विविध शाळांमध्ये झालेल्या या सोहळ्यात नवनियुक्त महापालिका आयुक्त आश्विनी भिडे, महापौर रितू तावडे यांनीही उपस्थिती लावली.
राजावाडी (घाटकोपर) येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये महापौर रितू तावडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विक्रोळी येथील हरियाली व्हिलेज सीबीएसई शाळेत शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या. दादर (पश्चिम) येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी गुलाबपुष्प, पेन्सिल आणि चॉकलेट भेट देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
तर गोवंडी येथील नटवर पारेख शाळेत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी भेट दिली. दादर येथील शाळेत उपआयुक्त डॉ. प्राची जांभेकर, उपशिक्षणाधिकारी ममता राव उपस्थित होते. तर, घाटकोपर येथे शिक्षणाधिकारी किर्तीवर्धन किरतकुडवे, उपशिक्षणाधिकारी (पूर्व उपनगरे) सायली सुर्वे आदींसह शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजावाडी शाळेतील प्रवेशोत्सवावेळी लेझीम हाती घेऊन, लेझीम पथकामध्ये स्वतः सहभागी होत महापौरांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांनतर तावडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांचा उत्साह वाढवला. विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा सुविधा, शैक्षणिक उपक्रम आदींची माहिती तावडे यांनी घेतली.
दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. त्यावेळी इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत आढावा घेतला. तसेच शाळेतील विविध प्रयोगशाळांनाही भेट दिली.
महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने मिशन ॲडमिशन, मिशन मेरिट असे उपक्रम हाती घेतले आहेत. तसेच, विद्यार्थ्यांमध्ये गणित आणि विज्ञान विषयांबाबत अधिक आवड निर्माण व्हावी, यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने ‘गणित गुरुवार’ उपक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून महानगरपालिकेने खान अकादमीसोबत सामंजस्य करार केला.
याबाबत उप आयुक्त प्राची जांभेकर यांनी माहिती दिली. दादर येथील संगणकीय प्रयोगशाळेत अभ्यास करणाऱ्या अंश पाटील, नील बद्री, आरुष वंगारी, अविघ्न शिंदे, श्रीराम चिकुला या विद्यार्थ्यांनी महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांना आकाशगंगा सांकेतिक भाषा, कृत्रिम बुद्धिमत्ता याबाबत परिपूर्ण माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अवगत केलेल्या गुणांचे भिडे यांनी कौतुक केले.
विद्यार्थीसंख्या किती?
राजावाडी (घाटकोपर) या शाळेमध्ये पूर्व प्राथमिक वर्गाचे एकूण ३६० विद्यार्थी आहेत. तसचे इयत्ता पहिली ते दहावीचे ७०० असे एकूण १०६० विद्यार्थी सीबीएसई मंडळाचे शिक्षण घेत आहेत. तर दादर येथील भवानी शंकर मार्ग शाळेत पूर्व प्राथमिक वर्गाचे एकूण २७० विद्यार्थी आहेत. यासह महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १९ शाळा आहेत. या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक वर्गाच्या एकूण १४२ तुकड्या असून, यामध्ये ५ हजार ५७३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच प्राथमिक शाळांच्या एकूण २७९ तुकड्या असून त्यात १० हजार ७८७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
