Mumbai Clean League 2026 / मुंबई : मुंबई शहर व उपनगरे स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याने मुंबई क्लीन लीग’ ही स्वच्छता स्पर्धा आयोजित केली असून आतापर्यंत या स्पर्धेसाठी एक हजारहून अधिक नागरिक, गृहनिर्माण संस्था व खासगी आस्थापनांनी नोंदणी केली आहे. या स्पर्धेसाठी महानगरपालिकेने तब्बल ४.२० रुपयांची पारितोषिके जाहीर केली आहेत.
महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबई शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी विविध उपक्रम व उपाययोजना केल्या जातात. स्वच्छतेसाठी दरवर्षी कोटींची तरतूद केली जाते. मात्र, तरीही मुंबई स्वच्छ ठेवण्यात महापालिकेला अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही. महापालिकेने ‘मुंबई स्वच्छता संकल्प ३६५’ या वर्षभर चालणाऱ्या व्यापक स्वच्छता अभियानाची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. त्या अंतर्गत १६ मार्च रोजी ‘मुंबई क्लीन लीग २०२६’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशासकीय विभाग, निवासी संकुले, व्यावसायिक आस्थापना, रुग्णालय, शाळा, उपहारगृह यांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. अभिनेता अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत १७ मार्च रोजी या स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. या स्पर्धेसाठी आतापर्यंत मुंबई शहर व उपनगरांमधून १,०९६ प्रवेश अर्ज आले आहेत. त्यात ९५२ नागरिक, १० व्यावसायिक आस्थापना, ४१ शाळा, ७ रुग्णालये, ११ उपहारगृहे, ६६ निवासी संकुले, ९ हॉटेल्स आदींचा समावेश आहे.
प्रशासकीय विभाग, निवासी संकुले, झोपडपट्टी परिसर, व्यावसायिक आस्थापना, रुग्णालये (शासकीय व खासगी), शाळा (शासकीय व खासगी), उपहारगृहे, सामुदायिक शौचालये, रस्ते, गल्ल्या, उद्याने व खुली मैदाने, बाजार परिसर आदी गटांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या सर्व गटांसाठी एकूण ४.२० कोटी रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील.
महानगरपालिकेने या स्पर्धेच्या नोंदणीसाठी क्यू आर कोड तयार केला आहे. इच्छुकांनी पालिकेच्या संकेतस्थळावर स्पर्धेचा संबंधित गट निवडून आवश्यक माहिती भरावी, स्वच्छता राखण्यासाठी नागरिक व सेलिब्रिटींना परिसर दत्तक घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
