मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी, तसेच मुंबईत पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी महानगरपालिकेकडून मूर्तिकारांना तात्पुरता मंडप उभारण्यासाठी नि:शुल्क परवानगी दिली जाणार आहे. तसेच महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या जागेनुसार ‘प्रथम अर्जदारास, प्रथम प्राधान्य ’ या तत्वावर केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांनाच आवश्यक ती जागा विनामूल्य उपलब्ध करण्यात येणार आहे. यासोबतच पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना शाडू माती विनामूल्य उपलब्ध करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यावर महानगरपालिकेचा भर आहे. यासाठी आतापासून नियोजन व कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून निरनिराळ्या सेवा-सुविधा पुरविताना पर्यावरणपूरक बाबींना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्तरीय कार्यवाही करण्यात येत आहे.
मूर्तिकारांना हव्या असलेल्या विविध परवानग्यांसाठी संगणकीय प्रणालीवर ‘एक खिडकी योजना’ शुक्रवार, २७ मार्चपासून महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे गणेशोत्सवासह नवरात्रौत्सवातील मूर्ती घडविण्यासाठी १० ऑक्टोबरपर्यंत महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर मूर्तिकार अर्ज करू शकणार आहेत. तसेच २० ऑक्टोबरपर्यंत या परवानगीची कालमर्यादा राहणार आहे. मूर्तिकारांना तात्पुरते मंडप उभारण्याकरीता मार्गदर्शक बाबी स्पष्ट करणारे परिपत्रक महानगरपालिकेने नुकतेच निर्गमित केले आहेत.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने १२ मे २०२० रोजी प्रसारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला दिले आहेत. हे लक्षात घेता २०२६ मधील गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी उत्सवांच्या अनुषंगाने महानगरपालिकेने मूर्तिकारांसाठी तात्पुरते मंडप उभारणे व अन्य बाबींकरीता परिपत्रकाद्वारे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, अशी माहिती महानगरपालिकेचे उपायुक्त व गणेशोत्सवाचे समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी दिली.
परिपत्रकातील ठळक बाबी
- सार्वजनिक अथवा खासगी जागेवर मूर्ती घडविण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात मंडप उभारण्याकरीता परवानगीची प्रक्रिया एक खिडकी योजनेद्वारे संगणकीय प्रणालीमार्फत (ऑनलाईन) महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर (https://portal.mcgm.gov.in) विभागीय सहायक आयुक्त व परिमंडळ उप आयुक्त यांच्यामार्फत पार पाडण्यात येईल.
- सार्वजनिक अथवा खासगी जागेवर मंडपांकरीता अर्ज सादर करताना मागील वर्षांची परवानगीची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- संगणकीय प्रणालीद्वारे प्राप्त झालेला नवीन अर्ज, तसेच त्यासोबतची कागदपत्रे यांची विभाग स्तरावर छाननी करण्यात येईल. योग्य पूर्ततेनंतर स्थानिक पोलिस ठाणे, वाहतूक विभागाचे ‘ना-हरकत’ इत्यादी संगणकीय प्रणालीद्वारे प्राप्त करण्यात येतील. त्यानंतर परिमंडळ उप आयुक्त, विभागीय सहायक आयुक्त यांच्यामार्फत मंडपासाठी परवानगी देण्यात येईल.
- पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून विभाग स्तरावर महानगरपालिकेच्या उपलब्ध असलेल्या जागेनुसार ‘प्रथम अर्जदारास, प्रथम प्राधान्य’ या तत्वावर केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांस आवश्यक ती जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी अर्जदार स्वत: मूर्तिकार असणे अनिवार्य आहे.
- पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता मूर्तिकारांना विनामूल्य शाडू माती उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत मूर्तिकारांना विनामूल्य नैसर्गिक /पर्यावरणपूरक रंग उपलब्धतेनुसार पुरविण्यात येणार आहे.
- केवळ पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती साकारणाऱ्या मूर्तिकारांना मंडपाची परवानगी देण्यात येईल. तेथे पीओपी मूर्ती घडविता येणार नाहीत. तसेच परवानगीचा उपयोग मूर्ती विक्रीसाठी करता नाही. तसे स्वयंघोषित हमीपत्र महानगरपालिकेकडे सादर करावे लागणार आहे.
- मूर्तिकारांना मंडप उभारण्यासाठी रस्ते / पदपथावर खड्डे खणण्यास प्रतिबंध असेल. मूर्तिकारांनी खड्डे न खणता तात्पुरता मंडप उभारणी तंत्राचा वापर करावा. जर खड्डे खणल्याचे आढळले, तर प्रति खड्डा दोन हजार रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यासोबतच, महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्याच्या वतीने निर्गमित विविध परिपत्रक आणि जाहिरात नियमांचे पालन देखील मूर्तिकारांनी करणे आवश्यक आहे.
- मूर्तिकाराने मंडपाच्या परवानगीकरिता अर्ज करताना ‘परिशिष्ट १’ (सार्वजनिक जागी मंडप बांधणीसाठी सादर करावयाचे हमीपत्रे), ‘परिशिष्ट २’ (खासगी जागेवर मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांनी मंडप बांधणीकरीता सादर करावयाचे हमीपत्रे), ‘परिशिष्ट ३’ (अग्नीसुरक्षेबाबत हमीपत्राचा विहित नमुना), ‘परिशिष्ट ४’ (मूर्तिकारांसाठी सोसायटीची ना हरकत) इत्यादी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
