मुंबई: महानगरपालिका प्रभाग क्रमांक ६२ (लल्लूभाई पार्क – श्रीराम झरोका) मधून शिंदे सेनेचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. ठाकरे सेनेचे झिशान मुलतानी हे तीन हजार ८२१ मतांनी विजयी झाले आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत वर्सोवा मतदारसंघात ठाकरे गटाचे कट्टर माजी नगरसेवक राजू पेडणेकर, राजूल पटेल यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. तरीही ठाकरे गटाच्या हारून खान यांनी भाजपच्या भारती लव्हेकर यांचा पराभव केला होता. त्यामुळे राजू पेडणेकर यांच्या निवडणुकीकडे लक्ष होते. प्रत्येक निवडणुकीत चंगेश मुलतानी हे अपक्ष म्हणून भरघोस मते घेत होते. एकदा ते नगरसेवक म्हणून निवडूनही आले. यावेळी त्यांनी स्वत: उभे न राहता मुलगा झिशान याला रिंगणात उतरवले. ठाकरे सेनेने उमेदवारीही दिली. झिशान हा विश्वास सार्थ ठरवत दहा हजार १५४ मते घेतली. पेडणेकर यांना सहा हजार ३३३ मतांवर समाधान मानावे लागले.

शैलेश फणसे विजयी

ठाकरे सेनेचे महापालिकेतील माजी सभागृह नेते, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व सलग तीन वेळा नगरसेवक राहिलेले शैलेश ऊर्फ यशोधर फणसे यांनी भाजपचे नगरसेवक योगीराज दाभाडकर यांचा फक्त ३७३ मतांनी पराभव केला.
फणसे यांना सहा हजार ६१० तर दाभाडकर यांना सहा हजार २३७ मते मिळाली.

फणसे हे कायम ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत. नारायण राणे यांनी ठाकरे यांना सोडचिठ्ठी दिली तेव्हा जयवंत परब यांच्यासह अनेकजण कॅांग्रेसमध्ये गेले. परंतु फणसे हे शिवसेनेतच राहिले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा त्याग केला तेव्हाही फणसे हे उद्धव ठाकरे यांच्यासमवेत राहिले.