मुंबई : मुंबईत प्रवेश करण्यासाठी असलेल्या चारही मार्गांच्या वेशीवर भव्य प्रवेशद्वारे आणि क्लॉक टॉवर उभारण्याची सूचना महापौर रितू तावडे यांनी केली होती. या सूचनेची वेगाने अंमलबजावणी करावी यासाठी वाशी नाका, ऐरोली नाका आणि मुलुंड नाका या तीन ठिकाणी रितू तावडे यांनी मंगळवारी स्थळपाहणी केली. प्रवेशद्वार ही केवळ कमानी पुरती मर्यादित संकल्पना नसून त्या सोबतीला सर्व नागरी सेवा-सुविधा युक्त संकुल विकसित करणे, त्यातून नागरिक आणि पर्यटकांना सर्व सुविधा मिळवून देणे तसेच महानगरपालिकेचा महसूल वाढवणे हा देखील उद्देश आहे. त्यादृष्टीने कालबद्ध आखणी करून प्रशासनाने कामकाजाला लागावे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी लवकरच सर्व संबंधित खात्यांसमवेत संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल, असे या दौऱ्यावेळी रितू तावडे यांनी नमूद केले.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईला दररोज लाखो पर्यटक भेट देत असतात. मुंबईत प्रवेश करताना पर्यटकांना मुंबईची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी, यासाठी मुंबईतील चारही प्रवेशद्वारावर भव्य प्रवेशद्वार व क्लॅाक टॉवर उभारण्याची तरतूद २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी महापौरांनी एका पत्राद्वारे महानगरपालिका आयुक्तांकडे केली होती. महापौरांच्या या सूचनेचा आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात पालिका प्रशसनानेही उल्लेख केला आहे.
महापौरांनी सुरुवातीली वाशी नाका, त्यानंतर ऐरोली नाका आणि अखेरीस मुलुंड नाका या ठिकाणी पाहणी केली. याप्रसंगी त्या म्हणाल्या की, यापूर्वी दहिसर नाका येथे पाहणी दौरा केला होता. त्यानंतर आज या तिन्ही ठिकाणी पाहणी केली. मुंबईतील चारही प्रवेश मार्गांवर प्रवेशद्वार आणि घड्याळ मनोरा उभारावयाचा आहे. पण ही संकल्पना फक्त कमानी उभारण्यापुरती मर्यादित नाही. मुंबईमध्ये प्रवेश करणारे नागरिक, अभ्यागत, पर्यटक यांना या प्रवेशद्वारांमधून मुंबईची ओळख जाणवली पाहिजे.
त्यामुळे हे सर्व प्रवेशद्वार मुंबईशी संबंधित सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक इत्यादी संकल्पनांवर आधारित असतील. तसेच या प्रवेशद्वारांच्या आजूबाजूला हरितक्षेत्र आणि उद्याने, वाहनतळ सुविधा, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र आणि वातानुकूलित प्रसाधनगृह, विश्राम कक्ष, त्याचप्रमाणे कोळी बांधव आणि महिला बचत गट आदींना आणि इतर व्यावसायिकांना दालन थाटता येईल अशी जागा, डिजिटल होर्डिंग त्याचप्रमाणे सौरऊर्जा प्रकल्प असे सर्व समावेशक संकुल (हब) निर्माण करावयाचे आहे. या संकुलाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेला कायमस्वरूपी महसूल प्राप्त होईल, हा देखील यामागचा उद्देश आहे, असे महापौरांनी नमूद केले.
सर्व ठिकाणी स्थळ पाहणी पूर्ण झाली असून आता प्रस्ताव तयार करून त्याला गती देण्यासाठी सर्व संबंधित खात्यांची लवकरच बैठक आयोजित करणार आहे. कालबद्ध आखणी करून हा प्रकल्प पूर्ण करावयाचा आहे. त्यामुळे सर्व संबंधित खात्यांनी आपापल्या संकल्पना आणि परिपूर्ण माहितीसह उपस्थित रहावे, असे निर्देशही महापौर रितू तावडे यांनी यावेळी दिले.
