मुंबई : संपूर्ण राज्यात पाणी टंचाई, दुष्काळ असताना मुंबई महापालिका मात्र यंदाही रस्ते पाण्याने धुणार आहे. मुंबईत सध्या १० टक्के पाणी कपात असून येत्या काही दिवसात राज्यभर पाणीकपात लागू होणार आहे. मुंबईत मात्र वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबईतील ६७७ किमी लांबीचे रस्ते धुतले जाणार आहेत. तसेच रस्ते धुण्यासाठी टँकर भाड्याने घेतले जाणार असून त्यासाठी तब्बल ८.२५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी आला असून यावरून पालिकेवर टीका होऊ लागली आहे.
पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागली की मुंबईतही गेल्या काही वर्षांपासून प्रदूषण वाढू लागते. त्यामुळे गेल्या आठवड्यात मुंबई महापालिका आयुक्त आयुक्त भिडे यांनी आगामी काळातील वायू प्रदूषणाच्या संभाव्य परिस्थितीचा आढावा घेतला.
पावसाळ्यानंतर रस्त्यांवर साचलेला गाळ, चिखल आणि धूळ हटविण्यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रमुख रस्ते, दुभाजक, चौक व रस्त्यांच्या कडांची विशेष स्वच्छता करण्यात येणार आहे. आवश्यकता असेल तर पुनर्वापराच्या पाण्याने रस्ते धुणे अथवा पाण्याची सूक्ष्म फवारणी केली जाणार आहे. रस्ते धुण्यासाठी पुनर्वापर केलेले पाणी फवारले जाणार असले तरी दुष्काळाच्या काळात पाण्याचा हा अपव्यय करण्यावरून टीका होऊ लागली आहे.
मुंबईतील वाढते वायू आणि धूळ प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने शहरातील तब्बल ६७७ किलोमीटर लांबीचे ३७७ सार्वजनिक रस्ते दररोज पाण्याने धुण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जेटिंग व्यवस्थेसह पाण्याचे टँकर भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असून, १५० दिवसांसाठी सात परिमंडळांत करण्यात येणाऱ्या या कामावर सुमारे ८.२५ कोटी रुपये खर्च होणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, शहरातील बांधकामे, पुनर्विकास प्रकल्प, वाहनांचे उत्सर्जन, औद्योगिक उत्सर्जन आदींमुळे वायू प्रदूषण वाढत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सार्वजनिक रस्त्यांची उच्च दाबाने पाण्याची फवारणी करून नियमित स्वच्छता करण्याचा उपाय करण्यात येणार आहे.
या कामासाठी २ हजार, ५ हजार आणि १० हजार लिटर क्षमतेच्या टँकरचा वापर करण्यात येणार आहे. २६ प्रशासकीय विभागांतील टँकरचे सात परिमंडळांत वर्गीकरण करण्यात आले आहे. सातही परिमंडळांसाठी स्वतंत्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे.
परिमंडळ १ साठी ८७.९८ लाख, परिमंडळ २ साठी ७५.१४ लाख, परिमंडळ ३ साठी ९६.६० लाख, परिमंडळ ४ साठी २.३१ कोटी, परिमंडळ ५ साठी १.१४ कोटी, परिमंडळ ६ साठी १.०८ कोटी आणि परिमंडळ ७ साठी १.१३ कोटी रुपये कंत्राट खर्च प्रस्तावित आहे. यानुसार एकूण ८.२५ कोटी रुपये खर्च येणार आहे.
पावसाळा वगळून कार्यादेश दिल्यापासून १५० दिवसांच्या कालावधीसाठी ही सेवा घेतली जाणार आहे. धूळ प्रदूषण नियंत्रणासोबतच शहरातील रस्त्यांच्या स्वच्छतेतही सुधारणा होईल, असा दावा महापालिकेने प्रस्तावात केला आहे.
जलतरण तलावांनाही पाणी
अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा धरणातील पाणीसाठा चांगलाच खालावला होता. त्यामुळे मुंबईत १५ मेपासून १० टक्के पाणी कपात लागू आहे. मात्र गेल्या चार महिन्यात पडलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा ९७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तरीही राज्यातील दुष्काळाची स्थिती लक्षात घेता मुंबई महापालिका प्रशासनाने पाणी कपात सुरूच ठेवली आहे. दुसरीकडे जलतरण तलावाचे बंद केलेले पाणी मात्र सुरू करण्यात आले आहे. यावरून आधीच मुंबईकरांमध्ये नाराजी असताना आता रस्ते पाण्याने धुतले जाणार असल्यामुळे पालिकेवर टीका होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, याबाबत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनावर टीका केली असून आधीच पाणी कमी असताना पाण्याचे नवीन स्रोत नसताना रस्ते धुण्यासाठी पाण्याचे नियोजन कसे करणार याबाबत प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी प्रतिक्रिया दिली. रस्ते धुण्यासाठी पुनर्वापराचे पाणी वापरले जाणार असले तरी दुष्काळाच्या काळात हा प्रस्ताव आणल्याबद्दल सभागृह नेते गणेश खणकर यांनीही नाराजी व्यक्त केली.
