मुंबई : मुंबईला दररोज होणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी तब्बल ३४ टक्के पाणी हिशोबबाह्य (नॉन रेव्हेन्यू वॉटर) आहे. पाणी गळती, पाणी चोरी, बिलांमधील त्रुटी यामुळे या पाण्यावरील महसूल मुंबई महापालिकेला मिळत नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी दिवसेंदिवस मुंबईकरांना अपुरे पडत असताना ३४ टक्के हिशोबबाह्य पाणी थांबवणे हेच आता पालिकेपुढील मोठे आव्हान आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणांतून मुंबईला दर दिवशी ४१०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. प्रत्यक्षात मुंबईची पाणीपुरवठ्याची दैनंदिन गरज ४६०० दशलक्ष लिटर आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे सात धरणांतील पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे पाण्याचे स्रोत वाढवण्यासाठी पालिका प्रशासनाने गारगाई धरण, निःक्षारीकरण प्रकल्प, सांडपाण्याचा पुनर्वापर असे विविध प्रकल्प आखत आहे. मात्र एकाबाजूला असलेल्या पाण्यापैकी ३४ टक्के पाणी पालिकेच्या हिशोबाच्या बाहेर असल्याची कबूली पालिका प्रशासनाने दिली आहे. दररोज सुमारे ४,८०० एमएलडी पाणी धरणांमधून उचलले जाते, त्यापैकी सुमारे ४,१०० एमएलडी पाणी नागरिकांना पुरवले जाते. उर्वरित पाण्यापैकी मोठा हिस्सा गळती, चोरी अथवा सदोष मीटरिंगमुळे कमी होतो.

पालिकेपुढे आव्हान

मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे ९७ टक्के भरलेली असली तरी ‘अल निनो’च्या प्रभावामुळे हे पाणी पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत पुरवण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे. मुंबईत सध्या १० टक्के पाणी कपात लागू असून ही पाणी कपात रद्द केल्यास पाणीसाठा जेमतेम मे महिन्यापर्यंत पुरू शकतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबत एक सादरीकरण स्थायी समितीमध्ये केले. त्यावेळी प्रशासनाने या हिशोबबाह्य पाण्याची माहिती सदस्यांना दिली.

४०० दशलक्ष लिटर पाणी वाचवण्याचे लक्ष्य

२०२१-२२ ते २०२३ या कालावधीत हे प्रमाण ३८ टक्क्यांवरून ३४ टक्क्यांवर आले आहे. आता हे प्रमाण आणखी किमान १० टक्क्यांनी कमी करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यातून सुमारे ४०० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. ४०० दशलक्ष लिटर पाणी म्हणजे प्रस्तावित गारगाई धरणातून मिळणाऱ्या पाण्याइतकेच पाणी असल्याचे बांगर यांनी नमूद केले. गारगाई प्रकल्पामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात दरदिवशी ४४० दशलक्ष लिटर पाण्याची भर पडण्याचे नियोजन आहे.

अनधिकृत जोडण्या कमी करण्यावर भर

पाण्याची गळती आणि अनधिकृत वापर कमी करण्यासाठी अनधिकृत जोडण्यांवर कारवाई करण्यावर भर दिला जात आहे. ‘सर्वांसाठी पाणी’ उपक्रमांतर्गत जून २०२२ ते ऑगस्ट २०२६ दरम्यान २६,७७४ पाणी जोडण्या देण्यात आल्या आहेत. कायदेशीर पाणीपुरवठा उपलब्ध असलेल्या भागातील अनधिकृत जोडण्या नियमित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

चार हजाराहून अधिक तक्रारी

जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत अनधिकृत पाणी जोडण्यांबाबत ४,०९० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ३,८०२ जोडण्या तोडण्यात तर २८२ जोडण्या नियमित करण्यात आल्या. शहरात १,२९४, पूर्व उपनगरांत १,५२८ आणि पश्चिम उपनगरांत १,२६८ तक्रारी नोंदल्या होत्या. गळतीच्या हजारो तक्रारी याच कालावधीत पाणीमीटर गळतीच्या १७,९०६ तक्रारी प्राप्त झाल्या असून, सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. त्यात शहरातील ५,३७५, पूर्व उपनगरांतील ६,५१३ आणि पश्चिम उपनगरांतील ६,०१८ तक्रारींचा समावेश आहे.