मुंबई : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य, घनकचरा, पायाभूत सुविधा अशा भांडवली कामांसाठी ४८,१६४ कोटींची तरतूद केलेली असून त्यापैकी तब्बल १६ हजार कोटी हे केवळ पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्थेच्या दर्जोन्नतीसाठी वापरले जाणार आहेत.

पुढील चार पाच वर्षात मुंबईच्या पाणी पुरवठ्यात सुमारे ८०० दशलक्षलीटर प्रतिदिन वाढ करण्यासाठी नियोजन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पाणीपुरवठ्यात वाढ करण्यासाठी यावर्षी पायाभूत सुविधांंच्या निर्मितीत नव अध्यायाची सुरुवात होत असल्याचा दावा अर्थसंकल्पातून भाजप सत्ताधारी पक्षाने केला आहे.

मुंबई महापालिकेने मध्यवैतरणा धरण बांधले त्यानंतर कोणतेही नवीन धरण किंवा पाणी पुरवठ्याचा स्रोत उभा केलेला नाही. त्यामुळे पाण्याची मागणी आणि पुरवठा यातील तफावत वाढली आहे. ही तफावत दूर करण्यासाठी पाणी पुरवठा वाढवणे आणि मलनिस्सारण व्यवस्था विस्तारित करणे यावर येत्या काही वर्षात लक्ष केंद्रीत करण्याचा मानस या अर्थसंकल्पात केला आहे.

त्यामुळे पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्थेची दर्जोन्नती करण्यासाठी मुंबई महापालिकेने तब्बल १६,०९२ कोटी रुपये भांडवली तरतूदीचा व्यापक अर्थसंकल्प यंदा प्रथमच प्रस्तावित केला आहे. यामध्ये पाणी पुरवठा, सांडपाण्यावर प्रक्रिया, मलनिस्सारण प्रकल्प, नि:क्षारीकरण प्रकल्प, जलबोगदे, जल शुद्धीकरण केंद्र, वर्सोवा नि:क्षारीकरण प्रकल्प, गारगाई प्रकल्प असे अनेक प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. या गुंतवणूकीचा उद्देश पाणी पुरवठा सुधारणे, मागणी व पुरवठ्यातील तफावत भरून काढणे हा आहे.

पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्था ही शहरी विकासाचा कणा आहे. ज्याद्वारे स्वच्छ पाण्याची उपलब्धता आणि मलनिस्सारणाचे व्यवस्थापन होत असते. ही व्यवस्था चांगली असेल तर शहरी भागातील पाण्याची मागणी व पुरवठा यातील तफावत दूर होऊ शकेल आणि भविष्यातील पाण्याची वाढती मागणी भागवणे शक्य होणार आहे. त्यामुळे येत्या चार पाच वर्षात मुंबईच्या पाणीपुरवठ्यात प्रतिदिन ८०० दशलक्ष लीटरची वाढ होईल असे नियोजन करून तेवढ्या पायाभूत सुविधा उभ्या करण्याचे उद्दीष्ट्य मुंबई महापालिकेने ठेवले आहे. त्यात समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्यासाठी मनोरी येथील नि:क्षारीकरण प्रकल्पापाठोपाठ वर्सोवा येथेही असाच प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.

अशी आहे तरतूद

पाणी पुरवठा – ७८०५ कोटी

  • सांडपाण्यावर प्रक्रिया – ५६९० कोटी
  • मलनिस्सारण प्रकल्प – २५६९ कोटी
  • मनोरी येथे प्रतिदिन २०० दशलक्षलीटर क्षमतेचा नि:क्षारीकरण प्रकल्प – ५०० कोटी
  • मनोरी ते चारकोप, कांदिवली जलबोगदा – २७० कोटी
  • भांडूप जलशुद्धीकरण प्रकल्प – २५० कोटी
  • गुंदवली जलबोगद्यापासून जलवाहिन्या – ११०० कोटी
  • गारगाई धरण प्रकल्प – ४३७ कोटी
  • कुलाबा सांडपाणी प्रकल्पाची दर्जोन्नती – ३० कोटी