मुंबई : मुंबई महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जिंकून आलेल्या २२७ नगरसेवकांपैकी तब्बल एक तृतीयांश नगरसेवकांच्या विजयाला त्यांच्या प्रतिस्पर्धींनी आव्हान दिले आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक याचिका या कार्यकाळात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांमध्ये सर्वाधिक याचिका या शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांविरोधात आहेत.

तर भाजपच्या तब्बल १८ नगरसेवकांविरोधात याचिका दाखल आहेत. ठाकरेंच्या नगरसेवकांच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाच्या उमेदवारांच्या याचिका सर्वाधिक आहेत. या याचिकांचे निकाल लागल्यास महापालिकेतील सत्तासमीकरणे बदलतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

जातीबाबत चुकीची माहिती देणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवणे, अन्य माहिती लपवणे अशा विविध कारणांच्या आधारे या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक जानेवारी २०२६ मध्ये पार पडली आणि त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी महापालिकेत पुन्हा एकदा सत्ता स्थापन झाली.

मात्र निवडून आलेल्या २२७ नगरसेवकांपैकी तब्बल ७९ नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान देण्यात आल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. तर अनेक अनुभवी नगरसेवकांना हरवून सभागृहात बसलेल्या नगरसेवकांविरोधातही या याचिका आहेत. नगरसेवकांच्या पदाची खरी लढाई न्यायालयात सुरू होण्याची चिन्हे आहेत. या याचिकांमध्ये सर्वाधिक २४ याचिका या शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांविरोधात आहेत.

नगरसेवक पदाला आव्हान देणाऱ्या याचिका मोठ्या संख्येने करण्यात आल्या आहेत. या याचिकांचे निकाल लागल्यास मुंबई महानगरपालिकेतील सत्तासमीकरण बदलू शकेल, असे मत काँग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केले. काँग्रेसच्या अनुभवी माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनीही प्रभाग क्रमांक १ च्या विजयी नगरसेविकेविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.

सध्या भाजपचे ८९, तर शिवसेना (शिंदे) पक्षाचे २९ नगरसेवक असे महायुतीचे एकूण ११८ नगरसेवक असून महायुतीकडे बहुमतासाठी आवश्यक ११४ संख्याबळापेक्षा केवळ चार जागा अधिक आहेत. मात्र, निवडणूक याचिकांमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळून पुढील घडामोडी घडल्यास परिस्थिती बदलू शकते, असे मत शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केले.

सध्या सर्वाधिक धोक्यातील पक्षांमध्ये शिवसेना (ठाकरे) आणि भाजप यांचा समावेश आहे. विशेषतः आरक्षण आणि जातवैधताविषयक अनेक याचिकांमध्ये न्यायालयांनी यापूर्वी कठोर भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे सर्वाधिक याचिका कोणाविरोधात दाखल झाल्या हा मुद्दा महत्त्वाचा नसून, न्यायालयीन छाननीत कोणत्या याचिका टिकून राहतात हा खरा प्रश्न आहे. जर या प्रकरणांपैकी काहींमध्ये फेरनिवडणुकांचे आदेश दिले गेले, तर मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये दुसऱ्यांदा राजकीय लढत रंगू शकते. सत्ताधारी आघाडीचे बहुमत फार मोठे नसल्याने प्रत्येक जागा निर्णायक ठरणार आहे, असेही शीतल म्हात्रे म्हणाल्या.

नगरसेवकांविरोधात दाखल निवडणूक याचिका

शिवसेना (ठाकरे) – २४ याचिका
भाजप – १८ याचिका
काँग्रेस – १० याचिका
शिवसेना (शिंदे) – ७ याचिका
एमआयएम – ७ याचिका