मुंबई : महानगरपालिका सभेचे सोमवार, २० एप्रिल रोजी प्रथमच युट्युबबर थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांसाठी कोणकोणते नगरसेवक पोटतिडकीने सभागृहात प्रश्न मांडतात, हे मुंबईकरांना पाहता येणार आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी हे प्रक्षेपण विरोधकांना अंधारात ठेऊन केले. याबाबत काहीही माहिती देण्यात आली नाही, असा दावा विरोधकांनी केला. थेट प्रक्षेपणाबाबत यापूर्वीच मागणी करण्यात आल्याचे सत्ताधाऱ्यांनी सांगितले.
लोकसभा, राज्यसभा, विधानसभा व विधानपरिषदेमध्ये होणाऱ्या प्रत्येक कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाते. त्यामुळे या कामकाजाची सर्वसामान्य जनतेलाही माहिती होते. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी किती प्रभावीपणे व परखडपणे त्यांच्या समस्या मांडत असतात हे लोकांपर्यंत थेट पोहोचते.
मात्र, हजारो कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची आतापर्यंत कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही नव्हती. त्यामुळे शहराच्या विकासात नगरसेवकांचे योगदान काय, हे सामान्य मुंबईकरांपर्यंत पोहोचत नव्हते. त्यामुळे सभागृह नेते गणेश खणकर यांनी महापालिका सभेचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी केली होती. त्यांचा सातत्याने पाठपुरावाही सुरू होता. त्यांनतर शिवसेनेचे (ठाकरे) नगरसेवक अंकित प्रभू यांनीही फेब्रुवारी महिन्यात थेट प्रक्षेपणाबाबत ठरावाची सूचना केली होती. मात्र, त्यावेळी भाजपच्या दिवंगत नगरसेविका अलका केरकर यांचे निधन झाल्याने महापालिका सभा तहकूब करण्यात आली. त्यांनतर शिवसेनेच्याच (ठाकरे) श्रद्धा जाधव यांनीही सारखीच ठरावाची सूचना केली.
मात्र, त्यावेळीही गायिका आशा भोसले यांच्या निधनामुळे चर्चा झाली नाही. त्यांनतर अखेर सोमवार, २० एप्रिल रोजी महापालिका सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यापूर्वीच महापालिका सभेचे थेट प्रक्षेपण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे ते पूर्ण झाले नाही. यापुढे महापालिका सभेचे कायम थेट प्रक्षेपण केले जाईल, असे सभागृह नेते खणकर म्हणाले.
दरम्यान, सोमवारी केलेल्या थेट प्रक्षेपणाबाबत विरोधकांनी काहीच कल्पना नसल्याचे विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना अंधारात ठेऊन सभेचे थेट प्रक्षेपण केले. हा त्यांचा मनमानी कारभार आहे. ठरावाची सूचना मांडल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया होणे गरजेचे असते. मात्र, प्रक्रियेविना त्याची अंमलबजावणी झाली, असे पेडणेकर म्हणाल्या. तसेच, हे प्रक्षेपण बेकायदेशीर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
