मुंबई : महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहाची जागा लोकप्रतिनिधींना बसण्यासाठी अपुरी पडत असून त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे क्रीडा भवनाच्या जागेवर टाऊनहॉल जिमखाना बांधण्याऐवजी महापालिका सभागृह बांधावे, अशी मागणी भाजपने स्थायी समितीच्या बैठकीत केली. या मागणीला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला. दरम्यान, संबंधित जागेवर तीन मजली इमारत बांधून त्यातील एक मजला महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या जिमखान्यासाठी देण्यावरही लोकप्रतिनिधींचे एकमत झाले.
महापालिकेत आयोजित स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी क्रीडा भवनाच्या जागेवर टाऊनहॉल बांधण्याचा प्रस्ताव सदस्यांसमोर मांडण्यात आला. मात्र, सभागृह नेते गणेश खणकर यांनी त्याला कडाडून विरोध करत संबंधित जागेवर महापालिका सभागृह बांधण्याची मागणी केली. महापालिका मुख्यालयातील सभागृहात ब्रिटिशकालीन ऐतिहासिक सभागृह नगरसेवकांसाठी अपुरे पडत आहे. अत्यंत दाटीवाटीने नगरसेवक सभागृहात बसतात. अनेकांना शारीरिक व्याधी असल्याने त्यांची गैरसोय होते. तसेच, पत्रकारांनाही बसायला जागा शिल्लक राहत नाही. या समस्येची दखल घेऊन काही आठवड्यांपूर्वी महापौर, गटनेते, महापालिका आयुक्त आदींनी शुक्रवारी सभागृहाची पाहणी केली. मात्र, अपुऱ्या जागेचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही. महापालिका मुख्यालयासमोर हाकेच्या अंतरावर असलेल्या क्रीडा भवनाच्या जागेवर टाऊनहॉल बांधण्यात येणार आहे. मात्र, तसे न करता सध्या गरज ओळखून त्या ठिकाणी सभागृह बांधावे, अशी मागणी खणकर यांनी केली. पुढील निवडणुकीत लोकप्रतिनिधींच्या जागा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यावेळी परिस्थितीत आणखी बिकट होईल. सध्याचे सभागृह पुरातन वारसा वास्तू यादीत असल्याने त्याला हात लावणे शक्य नाही. मात्र, नवीन सभागृहाची सोय करणे अत्यावश्यक आहे, असे खणकर म्हणाले.
मुंबईत १८०४ पासून टाऊन हॉल दिमाखात उभा आहे. त्यामुळे एका शहरात दोन टाऊन हॉलची आवश्यकता नाही. तसेच, क्रीडा भवनाला यंदा १०० वर्षे पूर्ण होत असून त्यावर महापालिका कर्मचाऱ्यांना हक्क आहे. नवीन सभागृह बांधताना त्यात महापालिका कर्मचाऱ्यांचाही प्राधान्याने विचार करावा, असे नगरसेवक यशोधर फणसे म्हणाले. सभागृहाचा विचार करताना त्यात वाहनतळाचीही सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी नगरसेवक सईदा खान यांनी केली. चर्चेअंती संबंधित प्रस्ताव पुनर्विचारासाठी महापालिका प्रशासनाकडे परत पाठविण्यात आला.
