मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयासमोर जीर्णावस्थेत असलेल्या क्रीडाभवन इमारतीच्या भूखंडाच्या जागेवर आझाद मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ सहा मजली नवे सभागृह उभारण्याचा प्रस्ताव लांबणीवर पडला आहे. याबाबतचा स्थायी समितीच्या पटलावर आणलेला हा प्रस्ताव प्रशासनाने मागे घेतला असून नव्याने प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. यापूर्वीही हा प्रस्ताव एकदा मागे घेण्यात आला होता. आता दुसऱ्यांदा हा प्रस्ताव मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प काही दिवसांसाठी लांबणीवर पडला आहे.

पालिका मुख्यालयासमोर क्रीडा भवन असून त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे क्रीडा भवनाच्या जागी टाऊन हॉल जिमखाना साकारण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले होते. त्याबाबतचा प्रस्ताव मार्च महिन्यात स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव अपूर्ण असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव परत पाठवला होता. या क्रीडा भवनच्या जागी आता मुंबई महापालिकेचे नवीन सभागृह बांधण्यात येणार आहे. त्याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला असून आधीच्या प्रस्तावातील कंत्राटदाराला त्याच अंदाजित खर्चात हे काम दिले जाणार आहे.

याबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव सत्ताधारी तातडीने मंजूर करतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेतला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबई महापालिकेचे सभागृह पुरातन असून या सभागृहाची आसन क्षमता आता कमी पडू लागली आहे. २२७ नगरसेवक, पालिकेचे कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासाठी हे सभागृह अपुरे पडू लागले आहे. सगळे २२७ नगरसेवक उपस्थित असतात तेव्हा हे सभागृह कमी पडते. नगरसेवकांना अतिशय दाटीवाटीने बसावे लागते. तर येत्या काळात आणखी दहा नामनिर्देशित नगरसेवक आल्यानंतर नगरसेवकांना बसायला जागाच उरणार नाही अशी स्थिती आहे.

भविष्यात नगरसेवकांची संख्या आणखी वाढल्यास अधिक आसन व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी हे नवीन सभागृह बांधण्यात येणार आहे. सध्या पालिका सभागृहात २२७ निवडून आलेले आणि १० नामनिर्देशित अशा एकूण २३७ सदस्यांची व्यवस्था आहे. मात्र भविष्यात प्रभागरचना आणि लोकसंख्येच्या वाढीमुळे सदस्यसंख्येत वाढ होण्याची शक्यता गृहित धरून नव्या सभागृहात ३३० नगरसेवकांसाठी आसन व्यवस्था प्रस्तावित करण्यात आली आहे. ३३० ते ३५० सदस्य क्षमतेचे अत्याधुनिक चित्रपटगृहाच्या शैलीतील सभागृह बांधण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला होता. या वर्षअखेरीस या सभागृहाचे काम सुरू करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. मात्र हा प्रस्ताव आणखी लांबणीवर पडला आहे.

मात्र केवळ तांत्रिक कारणास्तव हा प्रस्ताव मागे घेण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वात प्रथम सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार जिमखाना बांधण्याचे काम ज्या कंत्राटदाराला दिले होते त्यालाच हे काम, त्याच खर्चात दिले जाणार आहे. या कामाचा खर्च ३६ कोटी असून सर्व करांसह ही रक्कम ४४ कोटींवर जाणार आहे. मात्र यावेळी बांधकामाचे क्षेत्रफळ वाढले असून त्याचा उल्लेख प्रस्तावात नसल्यामुळे प्रस्ताव मागे घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नवे सभागृह असे

-सुमारे ९०० चौरस मीटर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या सहा मजली इमारतीत तळमजल्यावर सुमारे ६० वाहनांसाठी वाहनतळाची सुविधा असेल. पहिला आणि दुसरा मजला पोडियमसाठी राखीव असेल. तिसऱ्या मजल्यावर महापालिका कर्मचाऱ्यांसाठी जिमखाना उभारण्यात येणार आहे.

– चौथ्या मजल्यावर महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांची कार्यालये असतील. पाचवा आणि सहावा मजला एकत्रित करून अत्याधुनिक थिएटर-शैलीतील विधिमंडळाच्या धर्तीवर सभागृह बांधण्यात येणार आहे.

-या सभागृहात नगरसेवकांसोबतच पत्रकारांसाठी स्वतंत्र गॅलरी आणि महापालिका सभांसाठी आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.