पार्किंगसाठीच्या निविदेचे काम अंतिम टप्प्यात

निविदांना प्रतिसाद नसल्याने गेले वर्षभर मोफत उपलब्ध असलेल्या दक्षिण मुंबईतील ३९ वाहनतळांसह शहरातील ९१ वाहनतळांच्या निविदा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून या सर्व वाहनतळांवर सुधारित वाहनतळ धोरणानुसार शुल्कवाढ करण्यात येणार आहे. इमारतीबाहेर वाहने उभी करणाऱ्या रहिवाशांनाही मासिक शुल्क आकारले जाणार असल्याने पालिकेच्या महसुलात तब्बल दहापट वाढ होऊ शकेल.

पालिका निवडणुकांसाठी अडवून ठेवण्यात आलेल्या सुधारित वाहनतळ धोरणावरील स्थगिती राज्य सरकारने जानेवारीत उठवल्यानंतर आता शहरातील वाहनतळांसाठी नव्या शुल्कवाढीसह निविदा काढण्यात येणार आहेत. वाहनतळाच्या धोरणावरील स्थगिती उठवली तरी आचारसंहिता लागू असल्याने यासंदर्भात निर्णय घेता येत नव्हता तसेच निवडणूक कामात पालिका कर्मचारी व अधिकारी व्यग्र असल्याने नव्या शुल्कवाढीची समीकरणे जुळवण्यात वेळ गेल्याने निविदा काढण्यासाठी विलंब झाला. मात्र आता निविदांचे काम शेवटच्या टप्प्यात असून एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात निविदा प्रसिद्ध करण्यात येतील, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर यासंबंधीचा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीत मंजुरीला येईल. या प्रस्तावाला विरोध करण्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत असल्याने या धोरणाचा मार्ग कठीण असला तरी महसूल तसेच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी हे धोरण अमलात आणण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येतील.  या सुधारित धोरणामुळे पालिकेला २२ ते २५ लाख रुपये दर महिन्याला मिळतील, असा अंदाज आहे.

तीन वर्षांपूर्वी, २०१३ मध्ये भाजपचा अध्यक्ष असलेल्या सुधार समितीत हा प्रस्ताव मांडला गेला होता. २०१४ मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर हा प्रस्ताव फेटाळला गेला. ऑक्टोबर २०१४मध्ये पालिकेच्या सुधार समितीत व मुख्य सभागृहातही या प्रस्तावाला मान्यता दिली गेली. मात्र ए विभागातील रहिवाशांनी विरोध केल्याने राज्याच्या नगरविकास खात्याने या धोरणाला स्थगिती दिली. जानेवारीत ही स्थगिती उठवण्यात आली.

‘ए’ वॉर्डमधील वाहनतळांनाही कंत्राटदार

दक्षिण मुंबईतील कुलाबा, फोर्ट, चर्चगेट परिसरातील तब्बल ३९ वाहनतळांसाठी कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने गेले दहा महिने हे सर्व वाहनतळ मोफत उपलब्ध करून देण्यात आले. या वाहनतळांवर ४ हजार ९२४ चारचाकी व २ हजार २२२ दुचाकी वाहने उभी करता येतात. मात्र नियंत्रणाअभावी अनेक ठिकाणी वाहने नीट उभी न केल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. त्यामुळे या भागातील वाहनतळांनाही कंत्राटदार मिळणार आहेत.

’ सध्याच्या धोरणानुसार शहरात सर्वत्र चारचाकी वाहनाला प्रतितास १५ रुपये तर दुचाकी वाहनाला प्रतितास ५ रुपये आकारण्यात येतात.

’ सुधारित वाहनतळ धोरणानुसार जागा व गर्दीनुसार वाहनतळांची तीन प्रकारांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. चारचाकी वाहनांना दक्षिण मुंबईत प्रतितास ६० रुपये, रेल्वेस्थानके व बाजारपेठांजवळ ४० रुपये तर इतरत्र २० रुपये शुल्क आकारले जाईल. दुचाकी वाहनांसाठी हे शुल्क अनुक्रमे १५ रु, १० रुपये व ५ रुपये असेल.

’ इमारतीबाहेर गाडय़ा लावणाऱ्या रहिवाशांनाही परिसरातील शुल्काच्या एक तृतीयांश दराने मासिक शुल्क भरावे लागतील.