मुंबई : मुंबई महापालिकेसाठी दहा नामनिर्देशित नगरसेवकांची नावे बुधवारी सभागृहात घोषित करण्यात आली. भाजपचे सर्वाधिक चार सदस्य नामनिर्देशित असून त्यात विधानपरिषदेचे आमदार राजहंस सिंह यांचा मुलगा नितेश सिंह याला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे एकाच घरात दोन पदे मिळाली आहेत.
विशेष म्हणजे वडील-मुलाची ही जोडी काँग्रेसमधून भाजपात आलेली आहे. त्याचबरोबर भाजपने माजी नगरसेवक प्रवीण छेडा यांनाही नामनिर्देशित नगरसेवक म्हणून संधी दिली असून ते देखील काँग्रेसमधून आले आहेत. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांपेक्षा काँग्रेसमधून आलेल्यांनाच पदे देण्याची नामुष्की भाजपवर ओढवली आहे.
मुंबई महापालिकेचे २२७ प्रभाग असून दरवेळी पाच नामनिर्देशित नगरसेवक असतात. यंदा मात्र तब्बल १० नामनिर्देशित नगरसेवक महापालिका सभागृहात बसणार आहेत. राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार त्यांना स्वीकृतच्या जागा विभागल्या जातात. यंदाच्या निवडणूकीत भाजपला बहुमत असल्यामुळे सर्वाधिक ४ स्वीकृत नगरसेवक भाजपचे आहेत.
महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट यांना मिळून २ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना (ठाकरे) यांना तीन जागा तर कॉंग्रेसला एक जागा मिळाली आहे. या जागांसाठी राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निश्चित केले असून बुधवारी सभागृहात महापौर रितू तावडे यांनी या दहा नावांची घोषणा केली.
यांना संधी ….
भाजपकडून प्रवीण छेडा, नितेश सिंह, प्रतीप करपे आणि कमलाकर दळवी यांना संधी देण्यात आली आहे. त्यात प्रवीण छेडा हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते व विरोधी पक्षनेते होते. आता ते भाजपमध्ये आहेत. तर नितेश सिंह हे माजी विरोधी पक्षनेते व आताचे विधान परिषदेचे आमदार राजहंस हंस यांचे पुत्र आहेत. तर प्रतीप करपे आणि कमलाकर दळवी हे भाजपचे कार्यकर्ते आहेत.
शिवसेना (शिंदे) पक्षाला दोन जागा असून मागाठाणेतील आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे आणि भांडूपचे माजी नगरसेवक उमेश माने यांना संधी देण्यात आली आहे.
शिवेसना (ठाकरे) पक्षाने आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले साईनाथ दुर्गे यांना संधी दिली आहे. तसेच वडाळ्यात ज्यांना निवडणूकीला उमेदवारी मिळाली नाही त्या माधुरी मांजरेकर यांनाही संधी देण्यात आली आहे. तर कैलास पाठक हे उत्तर भारतीय असून जोगेश्वरीतील कार्यकर्ते आहेत. तर काँग्रेसने माजी नगरसेवक विरेंद्र चौधरी यांना संधी दिली आहे.
तज्ज्ञ राहिले बाजूला पदाधिकारी आणि नातेवाईकांनाच संधी …
तसेच राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार अर्हतेचे निकष पूर्ण करणाऱ्यांनाच नामनिर्देशित नगरसेवक म्हणून पाठवता येते. वैद्यकीय, शिक्षण, अभियांत्रिकी, कायदा अशा क्षेत्रातील तज्ज्ञ असण्याची अट असते. मात्र राजकीय पक्षांनी या सगळ्या अटींना बगल देत आपले पदाधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांनाच संधी दिली आहे.

