मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवकांसाठी इच्छुकांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. यंदा मुंबई महापालिकेत १० स्वीकृत किंवा नामनिर्देशित नगरसेवक येणार आहेत. यामध्ये सर्वाधिक चार नगरसेवक हे भाजपचे असतील. तर शिवसेना (शिंदे) पक्षाला केवळ एक नामनिर्देशित नगरसेवक पाठवता येणार आहे. विशेष म्हणजे ८ जागा मिळवणाऱ्या एमआयएम पक्षालाही एक नामनिर्देशित नगरसेवक सभागृहात पाठवता येणार आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून आता महापौर निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महापौर निवडीबरोबरच आता सगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना आता स्वीकृत नगरसेवक पदाचे वेध लागले आहे. राजकीय पक्षांमधील इच्छुकांमध्ये आता मागच्या दाराने सभागृहात प्रवेश मिळवण्यासाठी चढाओढ लागली आहे.
ज्यांना या निवडणुकीत अगदी थोड्या फरकाने हार पत्करावी लागली त्यांनीही आपल्याला स्वीकृत करावे म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. ज्या इच्छुकांना उमेदवारी नाकारली त्यांनाही स्वीकृतचे वेध लागले आहेत. तर ज्यांनी पक्षांतर केले त्यांनीही स्वीकृतचा आग्रह धरला आहे. राजकीय पक्षांनीही अनेक उमेदवारांना आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात राजकीय पक्षांना अगदी मोजक्याच जागा स्वीकृतमधून भरता येणार आहेत.
पूर्वी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत २२७ प्रभागांतून प्रत्येकी एक असे २२७ नगरसेवक निवडून येत होते. तसेच पाच नामनिर्देशित नगरसेवकांची नियुक्ती करण्यात येत होती. यंदा मात्र तब्बल १० नामनिर्देशित नगरसेवक महापालिका सभागृहात बसणार आहेत. राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार त्यांना स्वीकृतच्या जागा विभागल्या जातात.
यंदाच्या निवडणुकीत भाजपला बहुमत असल्यामुळे सर्वाधिक ४ स्वीकृत नगरसेवक पाठवता येणार आहे. तर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाला १ जागा मिळणार आहे. शिवसेना (ठाकरे) यांना तीन जागा, तर कॉंग्रेसला एक जागा मिळणार आहे. तर आठ नगरसेवक विजयी झालेल्या एमआयएम या पक्षालाही एक जागा मिळणार आहे. त्यामुळे एमआयएमचा आणखी एक नगरसेवक सभागृहात वाढणार आहे. मनसेला स्वतंत्रपणे एकही नामनिर्देशित जागा मिळालेली नाही. त्यांना ठाकरे यांच्या कोट्यातूनच जागा मिळू शकणार आहे.
नियम काय सांगतो
मुंबई महापालिका अधिनियमाच्या कलम ५ (१) (ब) नुसार १० नामनिर्देशित सदस्य, तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५ (२) (ब) नुसार १० टक्क्यांपेक्षा जास्त किंवा १० सदस्य यापैकी जे कमी असेल, इतकेच स्वीकृत नगरसेवक नेमता येतात. स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती सभागृहाच्या संमतीने होते. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या राजकीय पक्षाला जास्त जागा यामध्ये मिळतात. त्यासाठी महापालिकेने कोटा व सूत्र निश्चित केलेले आहे.
असे असेल स्वीकृत नगरसेवकांचे प्रमाण
- भाजप – ४
- शिवसेना (ठाकरे) – ३
- शिवसेना (शिंदे) – १
- कॉंग्रेस – १
- एमआयएम – १
