मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील एका कर्मचारी महिलेने लैंगिक छळ व अयोग्य वर्तनाबाबत केलेल्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने एका प्रशासकीय अधिकाऱ्याची सेवा समाप्त केली. कर्मचारी महिलेने केलेल्या तक्रारीत चौकशीअंती तथ्य आढळल्यामुळे प्रशासनाने ही कारवाई केली. ही कारवाई कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पालिकेच्या अंतर्गत तक्रार समितीच्या चौकशी अहवाल आणि शिफारशीच्या आधारे करण्यात आली.
दोन महिन्यांपूर्वी भाजपच्या विधान परिषदेच्या सदस्या चित्रा वाघ या तक्रारदार महिला कर्मचारी आणि तिच्या कुटुंबीयांसह महापौर रितू तावडे यांनी भेटल्या होत्या. त्यानंतर ७ मे रोजी रितू तावडे यांनी महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांना पत्र पाठवून त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून आरोपांची सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली होती. महापौरांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगत तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. तक्रारदार महिलेने या अधिकाऱ्यावर कार्यस्थळी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप केला होता. तक्रारदार महिलेला तिच्या वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर पालिकेमध्ये नोकरी देण्यात आली होती.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर पालिकेच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीने या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीत सदर अधिकारी दोषी आढळले. त्यानंतर समितीने त्यांची सेवा समाप्त करण्याची शिफारस केली आणि त्यानुसार प्रशासनाने सेवा नियमांनुसार कारवाई केली. पालिका प्रशासनाने त्या अधिकाऱ्याची सेवा समाप्त करण्याचा आदेश जारी केल्यानंतर या निर्णयाविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने पालिकेच्या आदेशाला कोणतीही अंतरिम स्थगिती दिली नाही. त्यामुळे त्यांची सेवा समाप्त करण्याचा आदेश सध्या कायम आहे.
