मुंबई: मुंबई महापालिकेतील बदल्यांसाठी करण्यात आलेल्या राजकीय शिफारशींची यादी चर्चेचा विषय ठरली आहे. शहर अभियंता विभागाशी संबंधित २२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नावांसमोर मंत्री, आमदार, खासदार आणि विविध लोकप्रतिनिधींची नावे नमूद आहेत. या यादीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा सर्वाधिक उल्लेख आहे.

या यादीत सहाय्यक अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंता पदावरील एकूण २२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या नावांसमोर विविध राजकीय नेत्यांची नावे नमूद आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा १० वेळा उल्लेख असून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नावाचा नऊ वेळा उल्लेख आहे. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन आणि आमदार कालिदास कोळंबकर यांच्या नावांचा प्रत्येकी सात वेळा उल्लेख आहे.

आमदार मंगेश कुडाळकर, अण्णा बनसोडे आणि तुकाराम काते यांच्या नावांचा प्रत्येकी सहा वेळा उल्लेख आहे. मुरजी पटेल आणि दिलीप लांडे यांनी पाच वेळा शिफारस पत्र दिली आहेत. याशिवाय महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे पक्ष आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक मंत्री व आमदारांची नावेही विविध अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नावांसमोर नोंदविण्यात आली आहेत.

शिंदे यांच्या कार्यालयाकडून समर्थन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याच्या कानाकोपऱ्यातून कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने करण्यात आलेल्या शिफारशींची संख्या अधिक असणे स्वाभाविक आहे. एखाद्या व्यक्तीसाठी शिफारस करण्यात आली म्हणजे त्याची बदली अथवा नियुक्ती करावी, असा त्याचा अर्थ होत नाही. अशा प्रकरणांमध्ये संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमांनुसार संपूर्ण चौकशी करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशीच भूमिका आहे,” असे शिंदे यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.