पाणीपुरी,  शेवपुरी, चायनीज भेळेसाठी वापरण्यात येणारी निकृष्ट दर्जाची फ्राईड नूडल्स, नमकीन मूगडाळ, मसालेदार चणाडाळ पालिकेच्या पथकाने मालाड येथून मंगळवारी जप्त केली. या प्रकरणी तिघांवर कारवाई करण्यात आली.
मालाडमधील भीमनगर, दिंडोशी; आंबेडकर नगर, आप्पापाडा आणि राजनपाडा, मित्तल कॉलेजच्या पाठीमागे या तीन ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर अनधिकृतपणे फरसाण बनविण्यात येत असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांना मिळाली होती.
पालिकेच्या पी-उत्तर विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांनी पालिकेच्या पथकासह या तिन्ही ठिकाणी मंगळवारी छापे टाकले. निकृष्ट दर्जाचे पीठ, आरोग्यास हानीकरक असलेले रंग, पामतेलाचा वापर करून पदार्थ बनविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. पालिका अधिकाऱ्यांनी छापे टाकताच निकृष्ट दर्जाचे तेल, माल, चणाडाळ, मूगडाळ उघडय़ा पिंपात गटाराजवळ लपविण्याचा प्रयत्न केला. १५० चौरस फुटांच्या जागेत भट्टी लावून हे फरसाण व तत्सम पदार्थ बनविण्यात येत होते.

हानिकारक रंगांचा वापर
पथकाने अन्य एका ठिकाणी मसालेदार, चटपटीत मटारचे दाणे निकृष्ट जर्दाचा व आरोग्यास हानिकारक रंग वापरून हिरवे करण्यात आल्याचे आढळले. हे पदार्थ चविष्ट बनविण्यासाठी त्यामध्ये कॉस्टिक सोडा वापरण्यात आल्याचेही आढळून आले. या प्रकरणी मालक कृष्णा मारुती पानसरे, अ‍ॅन्थनी राज आणि छत्रमल परिहार यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत १५ गोणी माल, १५ लिटर तेलाची २२ पिंपे, पाच गोणी निकृष्ट दर्जाचे पीठ जप्त करण्यात आले.