मुंबई : महानगरपालिकेने हाती घेतलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानाच्या अनुषंगाने पादचाऱ्यांना सुरक्षित, सुकर आणि अडथळामुक्त मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रशासकीय विभागांमार्फत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आलेल्या २०० पदपथांपैकी १३४ पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यात आले. या कारवाईत १९७ किलोमीटर अंतर इतके पदपथ अडथळामुक्त करण्यात आले आहेत. तसेच गेल्या दोन दिवसांत भांडुप रेल्वे स्थानक (पश्चिम) परिसरातील पदपथांवरील ९४ अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली.

उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मुंबईत पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमण तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेकडून ‘पादचारी प्रथम’ हे अभियान राबविण्यात येत आहे. आश्विनी भिडे यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, उप आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना ‘पादचारी प्रथम’ या अभियानाच्या काटेकोर अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. यासोबतच भिडे यांच्याकडून या अभियानाबाबत प्रत्येक प्रशासकीय विभागाचा आणि त्या विभागातील विविध खात्यांकडून सुरू असलेल्या कारवाईचाही आढावा घेण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत भांडुप परिसरात पहिल्या टप्प्यात १४ पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. या १४ पदपथांपैकी जवळपास ११ पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यात सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईमुळे भांडुप रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या, तसेच स्थानकाकडे जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळा झाला आहे. गर्दीच्या वेळेत होणारी वाहतूक व पादचाऱ्यांची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच भांडुप रेल्वे स्थानक परिसरातून लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या दिशेने नागरिकांना आता अडथळामुक्त पदपथ मिळणार आहेत. या कारवाईसाठी ५ जेसीबी, १० डंपर, ५० हून अधिक अधिकारी-कर्मचारी, १०० कामगार तसेच ७० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात २०० पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. त्यापैकी १३४ पदपथांवरील अतिक्रमण हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सुमारे १९७ किलोमीटर अंतर इतके पदपथ अडथळामुक्त करण्यात आले असून, १४५९ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या सर्व २६ विभागांत हे अभियान सुरू आहे.

पदपथ हे पादचाऱ्यांच्या सुरक्षित आणि सुलभ मार्गक्रमणासाठी आहेत. पदपथांवर अनधिकृतपणे दुकाने, स्टॉल्स, बांधकामे अथवा कोणतेही साहित्य ठेवून अडथळा निर्माण करू नये. ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत पदपथ अडथळामुक्त ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.