मुंबई : शहर आणि उपनगरातील रस्त्यांवर पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांबद्दल उच्च न्यायालायाने शुक्रवारी चिंता व्यक्त करून मुंबई महापालिका प्रशासनाला खडे बोल सुनावल्यानंतर शनिवारी पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी घनकचरा विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी दृश्यमान स्वच्छतेसाठी यंत्रणेला विविध निर्देश दिले.

वारंवार कचरा टाकल्या जाणाऱ्या संवेदनशील ठिकाणी सीसी टीव्हीद्वारे देखरेख ठेवून कचरा फेकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण हटवून पदपथ मोकळे करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले.

कांजूरमार्ग कचराभूमीतून पसरणाऱ्या दुर्गंधीसंदर्भातील याचिकांवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालायाने मुंबईतील कचरा व्यवस्थापनातील त्रुटींबाबतही चिंता व्यक्त केली. तसेच मुंबई महापालिकेला वारंवार फटकारले आहे. या पार्श्वभूमीवर आश्विनी भिडे यांनी या आठवड्यात दोन वेळा घनकचरा व्यवस्थापनाबाबत बैठक घेतली. त्यांनी शनिवारच्या बैठकीत स्वच्छतेशीसंबंधित विविध विषयांवर निर्देश दिले. यावेळी पालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

आयुक्तांचे निर्देश …

१) प्रशासकीय विभाग कार्यालयाच्या (वॉर्ड ऑफिस) सर्व सहायक आयुक्तांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात नियमितपणे स्वच्छताविषयक पाहणी करावी आणि व्यापक स्तरावर प्रभावीपणे स्वच्छता राहील याची काळजी घ्यावी.

२) शाळा, रुग्णालये, रेल्वे, मेट्रो स्थानक, बस स्थानक, तसेच बाजारपेठ आदी परिसरातील पदपथांवरील सर्व प्रकारचे अतिक्रमण तात्काळ हटवून पदपथ चालण्यास सुलभ करावेत.

३) अनधिकृत बांधकामांचे निष्कासन करावे, तसेच अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितित अधिकृत करू नये.

४) खड्ड्यांच्या तक्रारींचे प्राधान्याने निराकरण करावेत.

५) वारसा स्थळे, पर्यटनस्थळे, प्रमुख सार्वजनिक परिसर, तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहिमा राबवाव्यात.

स्वच्छता मोहीम तीव्र करणार

मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमा तीव्र करण्याचे ठरवले असून घनकचरा व्यवस्थापन विभागाने वारंवार कचरा साचणारी ठिकाणे शोधली आहेत. आता प्रत्येक ठिकाणांचे संरचित प्रक्रियेद्वारे परीक्षण केले जाणार आहे. यामध्ये कचऱ्याचा स्रोत व प्रकार ओळखणे; संकलन, वाहतूक, मनुष्यबळ व यंत्रसामग्रीतील त्रुटींचे मूल्यांकन करणे; रहिवासी, बाजारपेठा व व्यावसायिक आस्थापनांशी संवाद करणे; जनजागृती व वर्तन बदल उपक्रम राबवणे; सीसी टीव्ही आधारित देखरेख व अंमलबजावणी करणे, तसेच वारंवार नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे या बाबींवर येत्या काळात भर दिला जाणार आहे.

बाजारपेठा, मुख्य रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे व भूखंड, समुद्रकिनारे, नाले व इतर जलस्रोतांच्या परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच, नाले, खाड्या व समुद्रात प्लास्टिक व घनकचरा जाण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक ठिकाणी नियंत्रणात्मक प्रणाली अधिक मजबूत केली जाईल, असेही आश्विनी भिडे यांनी सांगितले.